सोबतीला उंबरा.



परतुनी येशील तु, ही आस मनी आहे
उंबर्‍यातच बैसुनी,  मी वाट तुझी पाहे

बहुत दिन सरले,  अन रात्रीही गेल्या
शुष्क नयनांच्या, उरल्यात कडा ओल्या

अजुनी डोळ्यात दिसशी, तु जाताना पाठमोरा
आठवणींच्या असंख्य दाटल्या, अंतरी येराझारा

शब्द तुझे सुगंधी, स्मरता श्रुती प्रफुल्लित
स्मित तुझे आठवता, नेत्र आनंदे स्फुरत

तुझ्या सहवासाची रांगोळी, घातली मी दारी
भावनांच्या छटा त्यात, नित्य मी निहारी

...गणवेश तुझा आला घरी,परि तु न त्यात आला
नियतीने डाव साधिला, घालुनिया घाला

देशाने केला गौरव, अर्पुनी चक्र तुजला
करुनिया सांत्वन दिधले, सन्मानचिन्ह मजला

काय करु त्या पदकाचे? ,ज्यात नाही माझा राया
श्रेष्ठ जरि सन्मानचिन्ह, तरि तुजविण वाया.

आबोली नंतर बोललीच नाही,  मोगर्‍यासही नसे गंध
चैतन्यची हरपून गेले , सर्व वातावरण कुंद.

ओवाळीले ते निरांजन, अजुनी आहे प्रदिप्त
मंद प्रकाशात त्याच्या, आशा जागविते सुप्त

झोपाळा बघ अजुनी हलतो,  परि न आपण त्यात
दिवस झरकन निघून जातो, छळते अख्खी रात.

अर्ध्यावर तु सोडुनी गेलास, तुझ्या मागुनी येईन म्हणते
परि हतबल आहे, तुझे प्रेम उदरी गुणगुणते

अवघडते शरिर, मन हृदय धडधडते
तुझे बीज अंतरी माझ्या, कलेकलेने वाढते.

येना....रे....परत.....सख्या..... पाश सर्व तोडुनी.
एकत्रच जाऊ पुन्हा, आत्म्यास आत्मा जोडुनी.

अजुनही  आस आहे, परतुनी येशील तु माघारा
आत तो अन बाहेर मी, वाट पहातोय तुझी,
अन सोबतीला उंबरा, 
अन सोबतीला उंबरा,

- संजय वायंगणकर -

8 comments: