जेथे जातो तेथे तु माझा सांगाती



     गुढी पाडव्याच्या दिवशी कुटुंबाबरोबर बसून टीव्ही सिरीयल पहात होतो. प्रसंग असा होता, एका कंपनीत मालक अकाउंटंट ह्या पदासाठी पेपरात जाहीरात देणार आहे. जुन्या अकाउंटंटला ह्या गोष्टीची माहीतीच नाही. पण त्याच्याबद्दल आपुलकी असलेले मित्र पुरते भांबाउन गेलेत, बेचैन झालेत. त्याना त्यांच्या त्या जुन्या मित्राची नोकरी वाचवायची आहे. त्याना त्या मित्राची, त्याच्या कुटुंबाची काळजी वाटते आहे, व त्यासाठी ते बॉसबरोबर बोलण्याचे ठरवताहेत. पुढे काय होणार? हे पुढच्या भागात कळेल. पण......................


     आज कालच्या कॉर्पोरेट युगात हे सामान्य झालय. सर्रासपणे चाललय. सकाळपर्यंत हसतखेळत काम करणाऱ्या कामगाराला संध्याकाळी निघताना अचानक सांगीतले जाते. मि. कुलकर्णी तुम्ही अकाउंटस् डिपार्टमेंटमधून तुमचा हिशोब घेउन जा. कंपनीला तुमच्या सेवेची सध्या गरज उरली नाही. तुमच्या जागेवर दुसऱ्या व्यक्तीची नेमणूक केली आहे.


"काय भयानक प्रकार आहे हा. कसलेही तारतम्य नाही. कसली माणुसकी नाही. माणसे म्हणजे काम करणारी मशीन्स आहेत का रे.... ?, त्याना काही भावना आहेत की नाही? इतकी वर्षे त्याने त्या कंपनीत सेवा दिलीय. त्या साठी त्याने त्याचे कौशल्य वापरलय, वेळप्रसंगी घरादाराकडे दुर्लक्ष केलय. मुलाबाळाना वेळ न देता, ओव्हरटाइम करुन तो खपलाय तुमच्या कंपनीसाठी. तुमच्या...??? त्याने स्वःताची कंपनी म्हणुनच काम केलय तिथे. जेवढा घरात नाही तेवढा वेळ तुमच्या कंपनीत वावरलाय तो.  त्याच घरच होत ते." 
  
     "बाबा आज मला फिरायला घेउन जा म्हणणाऱ्या  मुलांसाठी त्याच्याकडे वेळ नव्हता. आजारी आईला दवाखान्यात नेण्यासाठी त्याच्याकडे वेळ नव्हता. बायकोला सासुरवाडीला नेण्यासाठी त्याच्याकडे वेळ नव्हता. तुमच्यासाठी राबराब राबलाय तो. तुमची कामे होत होती तोवर तो तुमच्या कंपनीची शान होता. त्याच्या कर्तुत्वाने तुमची छाती फुगत होती. त्याचे कौतुक करताना तुमचे तोंड थकत नव्हते. मग का? का? असे वागलात त्याच्याशी ?
का ?"
     अजय तावातावाने एकटाच बोलत होता. सर्वजण स्तब्ध होते. कुणाकडे उत्तर नव्हते त्याच्या प्रश्नांवर. सर्वांच्या माना खाली होत्या. हतबल होते त्याचे सर्व सहकारी. 

         साधारण ३० वर्षांपुर्वी घराची जबाबदारी खांद्यावर घेतलेला अजय,     शिक्षण अर्धवट सोडुन नोकरी करु लागला. शिक्षण पुर्ण करता आले नाही म्हणून बेचैन असणारा अजय आता समजूतदार झाला होता. त्याचा त्याच्या देवावर विश्वास होता. मिळेल ते काम करत, नवीन नवीन गोष्टी आत्मसात करत तो  सर्व कामांत तरबेज झाला. त्याच्या निरपेक्ष वागणुकीने त्याने सगळ्याना आपलेसे केले होते. मोठ्या मोठ्या कस्टमरची कामे अजयने शिताफीने केल्याने ते खुष असत. त्यानी दिलेली बक्षीसे तो प्रेमळपणे नाकारत होता. पैश्यापेक्षा प्रतीष्ठा महत्वाची. पण  अजयकडे एक दुर्गुण होता. खर तर त्याला दुर्गुण म्हणायचे का? हाच एक प्रश्न होता. तो सडेतोड स्वभावाचा होता. मनात काहीही  आडपडदा न ठेवता तो निर्भीडपणे आपली मते मांडायचा. चापलुसी, बोटचेपेपणा, हाजी हाजी असला प्रकार नव्हता त्याच्या स्वभावात.
         
  
     काळानुसार संचालक मंडळी बदलत गेली. नवी मंडळी हेकेखोर व ढगात उडणारी होती. त्यांच्या चुकीच्या निर्णयाना अजयने विरोध केला. त्यांच्या चुका निदर्शनास आणुन दिल्या. कंपनीचे होणारे  नुकसान अजयची बेचैनी वाढवत होते. पण ह्या कॉर्पोरेट जगतात एक चुकीची पद्धत रुढ झालीय. "बॉस इज अल्वेज राइट". पण अजय हे वेगळेच रसायन होते. तो बॉसचा आदर करायचा, तसेच त्यांच्या चुका ही त्याना दाखवून द्यायचा. पुढे  जे व्हायचे तेच झाले. त्यांच्या डोळ्यात तो सलु लागला. ते अजयला टाळू लागले. त्याच्या शब्दाना होणारा विरोध पाहुन अजय आता  शांत बसू लागला. संचालकानी त्याची चारी बाजूने कोंडी केली होती. पिंजऱ्यात फडफडणार्या पक्षाप्रमाणे त्याची गत झाली होती. 

     "वय वाढलेला अजय, आता ही नोकरी नाविलाजाने करणार, त्याला या वयात या पगाराची नोकरी कोण देणार? संचालक मंडळ उवाच". ते अजयला खूप त्रास देउ लागले. पण म्हणतात ना, परमेश्वराच्या काठीला आवाज नसतो. ती ज्याच्यावर बसते त्यालाच कळते. 

      एक दिवस अचानक अजयच्या समोर एक व्यक्ती येउन ठाकते. त्या व्यक्तीच्या पडत्या काळात त्याला अजयने निरपेक्षपणे केलेली मदत त्याच्या ध्यानात असते. अजय त्याच्याकडे मन मोकळे करतो.

परमेश्वराची अगाध लीला काय असते पहा.


हा सदगृहस्थ आता खूप मोठा झालेला असतो. तो अजयला त्याच्या कंपनीत ऑफर देतो. अटी पाहील्यावर परमेश्वराच्या अकारण कारुण्याची झलक दिसतेच.


अट १ मी तुझा इंटरव्ह्यु घेणार नाही


अट २ माझ्या कंपनीत तु तुला जे आवडेल ते काम करावयाचे.


अट ३ तुला येण्याजाण्याची सोयीची वेळ तु ठरवायची.


अट ४ नवीन काम शिकण्यासाठी कोणतीही कालमर्यादा नाही.


अट ५ सर्वात महत्वाची तुला आता जेवढा पगार आहे तेवढा मी देणार.

     आज अजयच्या विठ्ठलाने त्याला त्याच्या नकळत कडेवर उचलून घेतले होते. व त्या पांडुरंगाला मिठी मारुन अजय त्याला प्रेमाश्रुनी चिंब करत होता.

सदर घटना एका सत्य कथेवर आधारीत आहे 
पात्राचे नाव बदलले आहे.

2 comments:

आधारवड




     डिसेंबर महीन्याची कडक थंडी पडली होती. प्रत्येक जण आपापल्या परीने थंडी पळवण्याचे वेगवेगळे उपाय योजत होते. उबदार ब्लँकेटमध्ये गुंडाळुन घेऊन काही जण झोपेची आराधना करत होते, तर काही आपापल्या पद्धतीने थंडी पळवत  होते.रात्रपाळीचा कामगार वर्ग नाईलाजाने चरफडत घराबाहेर पडत होता, काही घरात अजून टीव्हीचा आवाज चालू होता. दुसरीकडे रस्त्याच्या कडेला पुटपाथवर ताडपत्री टाकून रहाणारी कुटुंबे हवालदील झालेली दिसत होती. त्यांच्याकडे अंग झाकण्यासाठी पुरेसे कपडे नव्हते. उबदार अंथरुण पांघरुण तर त्यांच्या नशीबी नव्हतेच. होते फक्त कुडकुडणे. समोरच्या बाजूला रिकाम्या गँरेजमध्ये वाया गेलेले टवाळखोर दारुची पार्टी झोडत त्यांच्याच धुंदीत मदमस्त होते. त्यांच्या अधूनमधून खिदळण्याने रात्र जागी होत होती. सोसायटीचे पहारेकरी शेकोटीच्या उबेत गप्पा मारत बसले होते. डोळे जड होउन पापण्या एकमेकांवर आदळत होत्या. 

     वाचन बंद करुन अंथरुणात शिरणार, इतक्यात बाहेर कुजबुज ऐकू येउ लागली.  हळूहळू कुजबुजाटाचे गोंगाटात रुपांतर झाले. नक्कीच काही तरी घडलय, मी खिडकीतून डोकावले तर बाहेर गर्दी जमली होती. उत्सुकतेपोटी खाली उतरलो, माझ्याबरोबर काही शेजारीही जिना उतरत होते. 

     सोसायटीच्या बाहेर, वटवृक्षाखाली कोणीतरी छोटे मुल ठेवुन गेले होते. कोवळे अर्भक, जेमतेम सात आठ दिवसाचे असेल. भेदरलेला तो जीव आकांत करत होता. त्याच्या आजूबाजूला जमलेली गर्दी तर्क कुतर्क करत उभी होती. "मुलगी आहे," एक महीला सांगत होती. खुपच भयावह घटना होती ती, खूपच चीड आली होती त्या काळीज नसलेल्या आईबापाची. पहाटे लवकर कामधंद्यासाठी निघणारी मंडळी झोपेचे खोबरे झाले म्हणून मुलीला ठेवून जाणारांच्या नावाने शंख फुकत होती. त्यातही त्या  टवाळखोर मंडळीतून एका दोघानी अश्लील शेरेबीजी करुन स्व:ताची लायकी दाखवून दिली. काही जण मनापासून यावर उपाय शोधत होते. कुणी पोलीसाना तर कुणी अनाथाश्रमात फोन करत होते. बघताबघता रात्रीचे दोन वाजले. चलाख लोकानी बोलता बोलता काढता पाय घेतला.  आता तिथे हाताच्या बोटावर मोजता येतील एवढीच मंडळी होती. एका वृद्ध आजीने त्या बाळाला मांडीवर घेत गप्प करण्याचा प्रयास चालू ठेवला होता, पण ते अधूनमधून विदारकपणे आक्रोश करत होते. सगळेच भांबावून गेले होते, त्या भयाण थंडीत कुडकुडत उभे होते. कुठुनही काही मार्ग सुचत नव्हता. त्या बालीकेला वाऱ्यावर सोडणाऱ्याना शिव्याशाप देत एक एक जण सटकत होता. आजीलाही  तिच्या मुलाने हाताला धरुन घरी नेले. घेउन जाताजाता तीला दमही  दिला, "उगाच नसत्या भानगडीत पडू नकोस चल घरी". होय, ते बेवारशी बालक म्हणजे कठोर काळजाच्या समाजासाठी भानगडच होती. आता फक्त रडायचेच बाकी राहीले होते. देवा कडे हात जोडून विनवण्या करत होतो "असा कसा रे तु ? तो असहाय जीव थंडीत कुडकुडुन मरेल रे, त्याच्या आईबापाला सदबुद्धी दे, त्यांच्या हृदयाला पाझर फोड, त्या जीवाला जीवदान दे"...

     अश्रुना कोंडमारा सहन झाला नाही, ते बांध फुटल्यागत वहात होते. त्या बालीकेच्या जागी मला माझे  मुल दिसु लागले, आंतरीक वेदनेने मला ग्लानी आल्यासारखे वाटू लागले. कोसळणारच होतो तेवढ्यात  अचानक त्या लोकाना मागे सारत एक वृद्ध तेथे आला. त्याने चारी दिशाना नजर फिरवीली व शांतपणे त्या बाळाला उचलून छातीशी धरले. आक्रोश करणारा तो जीव आता शांत झाला होता. अजून एक आश्चर्याचा धक्का !!! त्या बाळाच्या अस्पष्ट पण हसण्याचा आवाज ऐकला...... तो वृद्ध कणखरपणे गरजला, "कोण म्हणतो तु बेवारस आहेस? कोण म्हणतो तुला घाणेरडे पाप? कोण म्हणतो तुला ना आई ना बाप ? अरे मी आहेना", आणि तसाच सगळ्यांकडे पाठ फिरवून तरातरा चालत गेला व मध्येच दिसेनासा झाला. क्षणात हे नाट्य घडून गेले.  सर्वजण हे घडताना फक्त पुतळ्यासारखे स्तब्ध होते निशब्द. अचानक सगळ घडल होत. भानावर येताच जो तो विचार करु लागला. "कोण? कोण होता तो? कोण असेल?"

     धडधडणाऱ्या हृदयाने, पाणावलेल्या डोळ्यानी आणी अंतरीच्या जाणीवेने ओळखले. अनाथांचा नाथ होता तो. वटवृक्षाच्या पारावर निराधाराला आधार देणारा आधारवड होता तो. आधारवड????  होय आधारवड होता तो.

4 comments:

चंदनयात्रा


     उगवत्या सुर्याला अर्ध्य देताना अण्णाचा हात थरथरत होता. आता हे नित्याचेच झाले होते.  अर्ध्य देताना आण्णा हल्ली एक वाक्य नेहमी पूटपूटत असे. पुरे झाले, आता लवकर बोलव रे रामेश्वरा. कशास मागे ठेवलस रे बाबा.

     गावावरुन मुंबईला शिकण्यासाठी आला आणी चाकरमानी झाला. तरी आण्णाला इथे करमत नव्हते. दिवस कसाबसा निघून जायचा पण रात्र तळमळत काढायचा. खाणावळ्याच्या घरात, गँलरीत निजताना गावाकडील आठवणीने गलबलून यायचे. गावचे घर, आईबाप, भावंडे, शेत, गोठा, बैल सगळे आठवून आण्णा उशी ओली करायचा. दिवस पुढे ढकलत ढकलत कमी खर्चाच्या खाणावळी बदलत बदलत आण्णा एकदाचा परबाकडे स्थिरावला. परब बाकी देवमाणूस हो, अडल्या नडल्यासाठी धावायचा. खाऊनपिउन सुखी, कुटुंबवत्सल. गावकऱ्यां चे खूप कौतुक परबाला. आल्यागेल्याकडे गावातली चौकशी करायचा आणी आठवणींची गाठोडी सोडायचा.

     धटधाकट दांडगा बाप, त्याला साप डसला, खूप धावपळ केली पण वाचला नाही. त्या दिवसापासून आईने अंथरुण धरले, हाय खाउन चार पोराना वार्यावर सोडुन महीन्याभरात बापामागोमाग गेली. परब सगळ्यात थोरला आणी धाकली फक्त २ वर्षाची. पोरका झाला परब. बापाची बहीण, परबाची आत्या बाकी धीराची, परबाला सांगीतले "हिम्मत कर आणी मुंबईला जा ह्या तीघाना मी बघते". 

     होळीत शेवटचा नारळ टाकून परबाने रडत रडत चाकरमान्यांबरोबर मुंबई गाठली. त्याच्या आयुष्याचीच  होळी झाली होती. १२ वर्षाचा कोवळा जीव, मिसरुड पण फुटले नव्हते. तालुक्याच्या बाहेर पाऊल न टाकलेला परब मुंबइत भांबावला होता. नवतीचे दोन दिवस संपले, शिक्षण नव्हते. कसाबसा महिना गेला. फुकट कोण खायाला घालते? टक्के  टोमणे ऐकून धायकुतीला आलेला परब रात्रीचा पिशवीत दोन कपडे टाकून बाहेर पडला. रस्त्यात रडत रडत भटकणार्या परबाला एका पारशाने पाहीले. पारशाच्या अनुभवी नजरेला ते जाणवले. त्याने परबाला जवळ बोलावून विचारपूस केली. आईबापानंतर इतक्या प्रेमाने कुणी विचारले नव्हते. परबाचा बांध फुटला, पारशाचा सदरा भिजवुन परब शांत झाला. पोरच तो, पोरकटच होता. आशेने किलकिल्या नजरेने तो पारशाकडे पहात होता. त्या चिमुरड्या जीवाच्या नजरेने पारशी घायाळ झाला होता. त्याने परबाला विचारले "माझ्याबरोबर येशील का? लहानसहान काम कर, पोटापाण्याची व्यवस्था मी करीन". परबाला पारशाच्या रुपात देवच भेटला होता.

     पारशी भला माणूस, चंदनाचा व्यापारी होता. तसेच इतर छोटेमोठे धंदेही होते त्याचे. पण मुलबाळ नव्हते. परब ईमाने ईतबारे मेहनतीने पारशाला कामधंद्यात मदत करु लागला. विश्वासु असल्यामुळे सगळ्यांचा जीव बसला त्याच्यावर. पारशाची बायको गुलरुख त्याला मुलाप्रमाणेच वागवत होती. आता गावी मनीऑर्डर जाउ लागली व परबाच्या आतेने सुटकेचा निश्वास सोडला. परबाची घरची स्थीती कळल्यावर पारशाने परबाच्या भावंडाना मुंबईला आणले. त्यांचे शिक्षण केले. परबाला तो स्वताच्या मुलाप्रमाणे वागवत असे. परबानेही कधी पायरी ओलांडली नाही. तो पारशाच्या कामकाजात रात्रंदिवस राबत होता. पारशाने परबाचे लग्न लाउन दिले. व त्याला तिथेच आडोशाला संसार थाटून दिला. दिवस सरत होते. परबाने ४० शी गाठली होती. पारशी आता थकला होता. परबच पारशाचे सर्व व्यवहार सांभाळू लागला. पारशाला आता शेवटचे वेध लागले होते, पारशाला मूलबाळ नव्हते. त्याने नातेवाईकांच्या नाकावर टिच्चून परबाला स्वताचा कायदेशीर वारस केला. कायद्याने परब आता सुखदेव मर्झबान चंदनवाला झाला होता. 

     परबाने भरल्या डोळ्याने ती कागदपत्रे देव्हाऱ्यात रामेश्वराच्या चरणावर ठेवली.  नमस्कार केला आणी शपथ घेतली. "हे देवा महाराजा मी  कोणाचो कोण?  मी तुका कधी बघीतलय नाय, पण ह्या पारशात माका तुजाच रुप दिसता. आज ह्यो नसतो तर रस्त्यार भीक मागत फीरलय आसतय. ह्यो दिवस बघूक मिळालो ही तुझी कृपा. आज तुझ्या पायाक हात लावन शपथ घेतय आजपासून माझ्याकडे येणार्या अडल्या नडल्या मानसांका जमात तशी मदत करीन, पन माझ्यासारखे ते दिवस वैर्याच्यापन नशीबात देव नको रे रामेश्वरा........."
बापाच्या डोळ्यातील अश्रु बघून परबाची मोठी झालेली मुलेही हेलावली व देवाला नमस्कार करुन निघून गेली.

      आण्णा कानात जीव आणून परबाची  सर्व कथा ऐकत होता. त्याला खुप हायसे वाटले. परबाने त्याला आसरा दिला. आण्णाला पोष्टात नोकरी लागली. कवडी कवडी जमवून आण्णाने घरटे बांधले, लग्न झाले सुशीलेसारखी सुशील बायको मिळाली. मुले झाली, शिकली सवरली, त्यांची लग्नकार्ये झाली. मोठी झाल्यावर घरटी सोडुन भरारी घेता घेता परदेशात स्थिरावली, ती पुन्हा माघारी आलीच नाही. सुशीलेच्या सोबतीत आण्णा स्वप्नातच नातवंडाशी खेळायचा. सुशीला पोरांच्या आठवणीने खंगत चालली होती. एकदा जिन्यावरुन घसरली आणी कंबरेत मोडली.

     आण्णा सून्न झाला. सुशीलाचे सगळच आता बिछान्यावरच होत होते.
आण्णा या वयातही  तिचं सर्वकाही स्वताच करत होता, जिद्दीने.   "कुटुंबासाठी खपली सुशीला, तिला परक्या हातात का सोपवू?" कसाबसा महीना काढला सुशीलाने. तीचे करताना आण्णाचे होणारे हाल सुशीलेच्या  जिव्हारी लागत होते.  त्या दिवशी सुशीलेने आण्णाला जवळ बोलवुन कनवटीला लावलेली उदीची पुडी त्याच्या  हातात दिली व म्हणाली पोरानी साथ दिली नाही, पण हीने जपले हो शेवटपर्यंत. बोलताबोलता सुशीलेचा हात सुटला. आण्णाचा हंबरडा ऐकुन चाळ धावली. आण्णाच्या नशीबी सुशीलेस भडाग्नी देण्याची पाळी आली. आण्णा आंतरबाह्य हलला ह्या घटनेने. त्याचा हंबरडा ऐकून माघ महीन्यातसुद्धा वरुणराजाने हजेरी लावली. आण्णाला आता कसलीच इच्छा उरली नव्हती. उगवत्या सुर्याला अर्ध्य देणे व संधीकालात तुलसीजवळ दिवा लावणे. सुशीलेचे कार्य तो  नेटाने पुढे नेत होता. पण आज काहीतरी वेगळेच वातावरण होते.  सुर्य बाहेरच येत नव्हता. ढगांत दडी मारुन बसला होता. नेहमीप्रमाणे अर्ध्य देता देता आण्णा अर्ध्यावरच कोसळला. आण्णाची तार रामेश्वराला पोचली. त्या दिवशी चाळीत कुणाची चूल पेटली नाही. सगळे हळहळत होते. कुठुन तरी परबाला खबर लागली. डोळ्याचा खाचा झालेला परब मुलांबरोबर स्मशानात पोचला. परबाच्या मुलानी सर्व व्यवस्था चोख ठेवली होती.

     सर्वजण आण्णाला चंदनाच्या लाकडांवर ठेवून शेवटचे दर्शन घेत होते. सगळ्यानी साश्रु नयनानी आण्णाचा निरोप घेतला. परबाला आधार देत त्याच्या मुलानी चितेजवळ नेले. थरथरत्या हाताने परबाने अग्नी दिला व आकाशात पाहून कुजबुजला. तुमची परंपरा जपली हो ह्या सुखदेव मर्झबान चंदनवालाने. आयुष्याचे चंदन केले हो तुम्ही. स्वतः झिजलात त्याचा सुगंध अजुन दरवळतोय अवतीभवती.

     तिथे सर्वत्र चंदनच होते. परबाच्या तीन लहान भावंडाना सांभाळत त्याची आत्या चंदनासारखी झिजली. परबाने आयुष्यभर अडल्या नडल्यांसाठी हाडे  चंदनासारखी झिजवली. पारशी दांपत्याने पोरक्या परबाला बापाची माया देउन आयुष्याचे चंदन केले. आण्णा कुटुंबासाठी चंदनासारखा जळला. सुशीला पोरांच्या विरहाचे दुःख विसरुन चंदनकाष्ठाप्रमाणे आण्णाबरोबर शेवटच्या श्वासापर्यंत उभी राहीली. जाताजाता मोडली पण जाताना आण्णाच्या हातात साईनाथांची उदी देउन स्वताच्या जीवनयात्रेचेच चंदन केले. आण्णा, सुशीला, परब ही सर्व साधी व देवभोळी माणसे दैवाला दोष न देता दुसऱ्यांसाठी झटणारी. स्वतः झिजून इतरांच्या जीवनात सुगंधाचा दरवळ पसरवणारी चंदनाची काष्ठे. आणि त्यांची ही चंदनयात्रा.

3 comments: