हक्क


          खळ्ळ्.............काच फुटल्याचा आवाज आश्रमाच्या शांततेला चिरत कानात शिरला. सर्वांच्या माना त्या दिशेला वळल्या. बकुळाबेन थरथरत त्या फुटलेल्या काचांकडे पहात घामाघूम झालेल्या स्थितीत उभ्या होत्या. "काय झाल बकुबेन?" प्रफुल्लताबेनने विचारलेल्या प्रश्नावर बकुबेनने मान वर केली. त्यांच्या डोळ्यात एक अनामिक भिती दाटली होती. त्या अजुनही थरथरतच होत्या. त्यांच्या खांद्यावर हात ठेवून प्रफुल्लताबेनने विचारले "बकुबेन बर नाहीय का? काही त्रास होतोय? डॉक्टराना बोलाऊ का?"  त्याना खुर्चीवर बसवून पाणी दिले. बकुळाबेन आता भानावर आल्या व म्हणाल्या "काही नाही पपुबेन, जुन्या आठवणीनी मनाचा ताबा घेतला, थोडसं गरगरल्यासारखे झाले बस्स्,  जाउ दे, वाढायच काम बाकी आहे. मी चालली" अन किचनकडे वळल्या. बकुळाबेनला थांबवत पपुबेन म्हणाल्या "आम्हाला नाही सांगणार बकुबेन?" सर्वजण प्रफुल्लताबेनला प्रेमाने पपुबेन अशी हाक मारत.


          क्षणभर  थांबून दीर्घ श्वास घेत बकुळाबेन म्हणाल्या  "ह्या पसरलेल्या काचांप्रमाणे आयुष्य विदीर्ण झाले आहे पपुबेन" . त्यांच्या हृदयात साठलेल्या दु:खाची कल्पना एव्हाना प्रफुल्लताबेनला आली होती. बकुबेनला बोलतं करुन, तिच्या दु:खाला वाट करुन देण्याचा मनोमन निश्चय तिने केला. "बकुबेन तुम्ही आम्हाला परकं समजता ! हरकत नाही, पण आम्ही तुम्हाला सदैव आप्तच मानलं,  सांभाळा स्वत:ला, मी निघते." पपुबेनची मात्रा बरोब्बर लागू पडली होती. बकुबेनने तिचा हात धरला व म्हणाली "गैरसमज करुन घेऊ नका  पपुबेन" प्रफुल्लताबेनने नजरेनेच सर्व आश्रमवासीयाना  निघण्याची खुण केली. आता तिथे फक्त दोघच होते.
          बकुळाबेनने विषण्णपने सुरुवात केली "काय सांगु पपुबेन, जिवनात फक्त वेदनांचे अंगार भरले आहेत. अधुन मधुन आठवणींच्या झुळुकीने ते प्रदीप्त होऊन मनाला होरपळुन टाकतात. " प्रफुल्लाताबेनने  तात्काळ सवाल केला.  का? का कवटाळून बसलात बकूबेन? फेकुन द्या ते बाहेर. मन मोकळ करा, नाहीतर ते अंगार तुमच्या जिवनाची राख करतील."

        कैवल्यधाम ह्या वृद्धाश्रमात बकुळाबेन मागील बरीच वर्षे वास्तव्याला होत्या. सदैव गप्प, आपल्या कामात मग्न, कुणाशीही व्यवहारापलीकडे बोलणे नाही. इतर वेळी त्या रामबाप्पाच्या मंदिरात असत. पहाटे लवकर उठून पुजा अर्चा करताना, विशेषत: बाप्पाच्या मुर्तीला स्नान घालताना त्यांचा भाव पहाण्यासारखा असे. कलशातील जलापेक्षा नेत्रातील भावाश्रुनीच त्या मुर्तीना स्नान घडे. भजन कीर्तनात तल्लीन होऊन जात. मंदिरातील दैवतांचे पुजन कार्य गेली बरीच वर्षे त्यानी अखंडपणे सांभाळले. प्रफुल्लताबेननेसुद्धा त्यांच्या कामात कधी ढवळाढवळ केली नाही. प्रफुल्लताबेन आश्रमाच्या व्यवस्थापिका होत्या. करारी शिस्तीच्या पण तेवढ्याच प्रेमळ. त्यामुळे कैवल्यधाम वृद्धाश्रमाचे नाव पंचक्रोशीत प्रसिद्ध होते. त्यांच्या आश्रमाला समाजातुन भरपुर देणग्याही येत असत.

       बकुलबेनने मनाची तयारी केली, सावरून बसत त्यांनी आजूबाजूला पाहीले क्षणभर डोळे मिटले, पण त्यांच्या तोंडुन शब्द निघण्याऐवजी हुंदकाच बाहेर आला. प्रफुल्लताबेनने त्याना मायेने गोंजारले. थोडा वेळ थांबून त्यानी  सुरुवात केली. त्या गंभीरपणे बोलू लागल्या   "आयुष्य फक्त जखमानीच भरले आहे व त्या माझ्या स्वत:च्या आप्तानीच केल्या आहेत कुणी परक्यानी नाही पपुबेन. वयाच्या सोळाव्या वर्षीच लग्न झाले. नवरा ट्रांन्सपोर्ट कंपनीत ड्रायव्हर म्हणून नोकरीला होता. बाहेरगावचा प्रवास, महिन्यातून तीन चार वेळा घरी यायचा बाकी बाहेरच, घरी लहान दीर व व नणंद, दीर बय्रापैकी शिकलेला, धाकटा म्हणून लाडावलेला, नणंद कॉलेजात जायची. सासू जुन्या कपड्यांच्या बदल्यात भांडी देण्याचे बोहारणीचे काम करायची, दीर जवळच नोकरी करायचा. सकाळी सासु व दीर बाहेर पडायचे, दीर दुपारी जेवायला घरी यायचा. नणंद दुपारी कॉलेजला, मीच घरचं सर्व बघायची. दीराच जेवणखाणं उरकून दुपारी थोडी विश्रांती घेत असे. दीराची नजर वाईट होती. जाता येता जाणीवपुर्वक धक्के मारायचा. नवरा घरी यायचा तेव्हा एक दोन वेळा त्याच्या कानावरसुद्धा घातले, पण तो हसण्यावारी न्यायचा, म्हणायचा माझा भाऊ  तसा नाही तु उगाच त्रागा करतेस. पण त्याच्या नजरेतील वखवख मला सहन व्हायची नाही. एकदा दीराला दम सुद्धा दिला पण तो सुधारला नाही. एकदा तर कहरच झाला, मी झोपलेली असताना तो अंगलटीलाच आला. मी चिडले लाथ मारुन त्याला उडवले. तो भिंतीवर आपटला त्याच्या डोक्याला मार लागला, रक्त आले, मी घाबरले होते, तो मला अर्वाच्य भाषेत शिव्या देऊ  लागला. संध्याकाळी सासूला बाहेरच गाठून त्याने तिचे कान फुंकले. सासुने घरात पाउल टाकताच मला मारहाण करावयाला सुरुवात केली. त्यानेसुद्धा माझ्यावर हात उचलला. मी गयावया करत सांगत होते माझी चुक नाही, पण काहीही न ऐकता त्या दोघानी मला बेदम मारले. माझे हातपाय धरुन तोंडात बोळा कोंबला व पलंगाखाली मला बांधुन ठेवली. मी त्यावेळी दोन महीन्याची गरोदर होते, पण त्याना दया आली नाही. दोन दिवस मला त्याच स्थितीत अन्नपाण्यावाचून उपाशी ठेवले. दीर नातेवाईकांकडे निघुन गेला. मी असहाय्य अवस्थेत कण्हत परमेश्वराचा धावा करत होते. सकाळ संध्याकाळ मी नेहमी घराबाहेरच्या तुळसीचे पुजन करायची, दिवा लावायची. दोन दिवस मी दिसले नाही म्हणून सहजच शेजारच्या डुंगरशीबाप्पाने खिडकीतून घरात डोकावले असता त्याना माझ्या कण्हण्याचा आवाज आला. पलंगाखाली हालचाल जाणवली. त्यानी पोलीसांत खबर दिली. पोलीसानी दार तोडुन मला सोडवली. मी पोलीसांत तक्रार दाखल केली, पण घरच्यानी पोलीसाना लाच देउन व माझी खोटी माफी मागून प्रकरण दाबून टाकले. नवरा बाहेरगावाहून परत आल्यावर त्याने सुद्धा मला मारले व पुन्हा पोलीसात गेल्यास जीव घेण्याची धमकी दिली. माझा नाईलाज झाला. नवरासुद्धा माझा राहीला नव्हता. मी डुंगरशी बाप्पाकडून उधार पैसे घेऊन बोचके बांधले व सर्वांची नजर चुकवुन माहेर गाठले. घरी वयस्कर वडील व लहान भाऊ, आईने भावाला जन्म देतानाच डोळे मिटले होते. वडीलानीच आम्हाला वाढवले. सासरच्यांशी लढा देण्याची त्यांची ताकद नव्हती. उगाच तमाशा नको म्हणून आम्ही गप्प राहीलो. वडील व भाऊ मला गर्भपातासाठी जबरदस्ती करत होते. पण मला त्या निष्पाप जिवाचा बळी द्यायचा  नव्हता. मी त्याला जन्म देण्याचा निर्धार केला. माझा माझ्या भगवंतावर विश्वास होता. आता तोच माझा आधार होता. 

          मी नव्या उमेदीने सुरुवात करावयाचे ठरवले. जवळपासच्या चारपाच घरांत जेवण बनविण्याची कामे स्विकारली. एकदा मी भरतभाईंच्या घरी  बनवलेला ढोकळा सर्वाना खुप आवडला. ते म्हणाले "तुझ्या हाताला चव आहे, तु हा व्यवसाय म्हणून करण्याचा विचार कर." मी म्हणाले" मला कुणी जास्त ओळखत नाही, मला सहजासहजी ऑर्डर कोण देणार? एकटी बाई अनोळखी दुकानात कशी फिरु?" भरतभाईनी त्यावरही मार्ग काढला. ते म्हणाले मी कापड मार्केट मध्ये व्यापार करतो, माझ्या ओळखीच्या दुकानांत मी तुझ्या ढोकळ्यासाठी शब्द टाकतो, बघुया काय जमतं काय ते" कापड मार्केटमध्ये त्यानी प्रयास केले. मी बनवलेला ढोकळा सर्वाना आवडला. मला ऑर्डर्स मिळू लागल्या, मग मी ही हिम्मत करुन दुकानात जाऊन ऑर्डस घेऊ लागली. ढोकळ्याने मला साथ दिली, परमेश्वराच्या कृपेने माझा व्यवसाय वाढला, बघता बघता माझा व्याप वाढत गेला. आता माझ्या कामात माझा लहान भाऊ जतीन पण मदत करु लागला. सायकलवरुन तो ढोकळ्याची डिलीवरी देत होता. माझे गर्भारपणाचे दिवस भरत आले होते, हालचाली मंदावल्या होत्या.  त्याही स्थितीत मी रिक्षातुन ऑर्डर्सची डिलीवरी देत असे. काही समजदार दुकानदार घरुनही डिलीवरी नेत. आणी परमेश्वराच्या कृपेने माझ्या जिवनात आनंदाचा क्षण आला. नगीनचा जन्म झाला. मी खुप आनंदात होते. माझी जबाबदारी वाढली होती. परमेश्वराच्या कृपेने मी मागील सर्व विसरुन जोमाने कामाला सुरुवात केली. मला नगीनला खुप शिकवून मोठा करावयाचा होता.

          पुन्हा एका अनपेक्षीत धक्क्याने  माझ्या संसारावर दु:खाचे सावट पडले. माझा धाकटा भाऊ जतीन, ढोकळ्याची डिलीवरी सायकलवरुन नेताना ट्रकखाली सापडून अपघातात गेला." बकुळाबेनला भावाच्या आठवणीने भरुन आले व त्या रडू लागल्या. प्रफुल्लताबेनने त्याना मायेने कुशीत घेतले. "शांत व्हा बकुळाबेन शांत व्हा.…  हे भगवान ! कुणाच्याही जिवनात असे दु:ख येऊ देऊ नकोस रे." त्याना मध्येच थांबवत बकुळाबेनने डोळे पुसले व म्हणाल्या. " देवाला दोष का द्यायचा पपुबेन? देव कुणाचेही वाईट करत नाही. हे आमच्या प्रारब्धाचे भोग आहेत. अहो देवामुळेच तर मी  पुन्हा नव्या उमेदीने उभी राहीलीय. मी ठरवीले होते, आयुष्यात कितीही कठीण प्रसंग येऊ देत पण मी माझ्या नगीनला परिस्थीतीचा बळी होऊ देणार नाही. परमेश्वर माझ्या साथीला आहेच.  नगीनला पाठीवर बांधून  मी ढोकळ्याच्या ऑर्डर्सची डिलीवरी देत असे. कधी कधी नगीन रडून हैराण करायचा, तेव्हा मला खुप वाईट वाटायचे पण नाईलाज होता. हळूहळू नगीन मोठा झाला. त्याचे शिक्षण पुर्ण केले. आर्कीटेक्ट झाला. माझ्या वैराण वाळवंटात हिरवळ आली. मी माझ्या स्वत:च्या घराचे स्वप्न पाहु लागले. देवबाप्पाने तेही पुर्ण केले. माझा विश्वास बळावला पण नियतीच्या मनात काही वेगळेच होते. आणी तो भयानक दिवस ऊजाडला....." बकुबेनच्या डोळ्यात आता त्वेषाची आग होती, मुठी आवळलेल्या,  त्या संतापाने थरथरत होत्या. बकुबेनचे हे नविनच रुप प्रफुल्लताबेन पहात होती. बकुळाबेनने डोळे मीटले व त्यातुन अश्रु ठिबकले. पुढे काय ऐकायला मिळतेय ह्या जाणीवेनेच प्रफुल्लताबेनने देवाला हात जोडले व बकुळाबेनच्या खांद्यावर हात ठेवला. दीर्घ श्वास घेऊन बकुळाबेन पुन्हा बोलु लागल्या.

          "अचानक एके दिवशी नगीन एका मुलीला घरी घेऊन आला व म्हणाला "बा ही सलमा, माझी कॉलेजची मैत्रीण, आम्ही रजीस्टर लग्न केले. कारण हीच्या घरुन आमच्या लग्नाला परवानगी नव्हती. मी सुन्न झाले. ते शब्द माझ्या काळजात कट्यारीप्रमाणे घुसले. कसे बसे स्वताला सावरुन त्याला विचारले, "नगीन अरे कधी बोललाही नाहीस ते!!! का? मला सांगायची गरज भासली नाही?" मान खाली घालून तो पुटपुला "बा अग समजून घे ग, जिच्याबरोबर मला संसार करावयाचा आहे तिला, माझ्या आवडीनुसार निवडण्याचा हक्क नाही का मला?"  मी चिडले, नगीनच्या कानशीलात भडकवून म्हणाले "हक्क? अरे स्वत:च्या आईशी हक्काच्या बाता करतोस? एक बेसहारा गर्भवती घर सोडून निघते, तेव्हा तु पोटात होतास. सर्वानी मला गर्भपाताचा सल्ला दिलेला. नगीन , अरे मलाही माझ्या भविष्याचा हक्क होता रे, पण मी गर्भपात नाही केला. तुला जन्म दिला. तु कधी तुझ्या बापाचा चेहरा तरी पाहीला आहेस का? तुला त्याची उणीव कधीच भासू दिली नाही. अरे तुला पाठीला बांधून राबराब राबले. घर सांभाळून दुकानात ढोकळ्याच्या ऑर्डर्स पुर्ण करताना जिवाची घालमेल होत होती.पण त्याची तुला झळ पोहोचू दिली नव्हती. तुझ्यासाठी एकटीने रात्री रात्री जागून काढल्या,  त्याची तुला जाणीव कुठे आहे?  स्वत:च्या आजारपणातही कधी विश्रांती नाही मिळाली मला. का? तो माझा हक्क नव्हता का? कामाच्या व्यापात कधी वेळेवर पोटात अन्न गेले नाही, कधी कधी उपासही घडले पण तुझ्या प्रेमापोटी मला कधीच वाईट वाटले नाही रे. मी माझा कधी विचारच केला नाही. का? तो माझा हक्क नव्हता का?. तुझे शिक्षण ह्या अनपढ बाईने घर सांभाळून केले, सासरच्या माणसांची वाईट सावलीही पडू दिली नाही तुझ्यावर, अरे एकदा बोलून तरी पहायचे होतेस रे आपल्या आईशी, का? माझ्यावर विश्वास नव्हता? का? तो माझा हक्क नव्हता? अरे नगीन मी किती जगले रे स्वत:साठी? मला माझ्या मनाप्रमाणे जिवन जगण्याचा हकक नव्हता का???  तु माझा विश्वासघात केला आहेस नगीन. चुकलचं माझ!! मीही विसरले होते, शेवटी तुझ्यात त्या नराधमाचेसुद्धा रक्त आहे नाही का? तेच वरचढ ठरले रे". बोलता बोलता बकुळाबेन ओक्साबोक्सी रडू लागल्या, बाहेर उभे असलेली वृद्ध मंडळी हळूहळू आत आली. ही कथा ऐकून प्रत्येकाचे डोळे पाणावले होते. काही जणाना त्यांच्या जिवनातील दु:खद घटना आठवून तेही हुंदके देत होते. प्रफुल्लताबेनने पदराने डोळे पुसले. त्याना रडताना आश्रमवासी प्रथमच पहात होते.

          प्रफुल्लताबेनने बकुळाबेनला विनंती केली "बस्स् बकुबेन बस्स् नाही सहन होत आता, एखाद्या जीवाने किती यातना सहन कराव्यात याला सुद्धा मर्यादा असतात." बकुळाबेनने पाण्याचा ग्लास रिकामा केला अन म्हणाल्या " पपुबेन मला आज मला माझ्या हृदयातील प्रत्येक निखारा बाहेर फेकावयाचा आहे. काळीज शांत करावयाचे आहे. मला बोलू द्या. मी वर वर जरी शांत वाटत असले तरी आत दाह आहे. माझ्या आप्तानी जाळलेल्या स्वप्नांचा धूर अजुन धुमसतोय, त्याला वाट करुन द्यायची आहे. वर्षानुवर्षे कोंडमारा सहन केलेल्या मनाला मोकळा श्वास घेऊ द्या, मला बोलू द्या पपुबेन मला बोलू द्या." सर्वाना बसण्याची खूण करत प्रफुल्लताबेन म्हणाल्या " ठीक आहे. बोला बकुबेन" बकुबेनचा आवाज गंभीर झाला."मी नगीनला म्हणाले ठीक आहे तुझ्या मनाप्रमाणे होईल. काही दिवसात त्याचे पद्धतशीर लग्न लाऊन दिले. माझे शेवटचे कर्तव्य पार पाडले. माझ्या आशाआकांक्षांची राखरांगोळी झाली होती.  पपुबेन, सर्व दु:ख पचवली पण नगीनने केलेली जखम कधीच भरली नाही. ते दु:ख मी नाही पचवू शकले. लग्नाच्या दुसय्रा दिवशीच नगीनच्या तोंडावर घराच्या चाव्या फेकल्या व सांगीतले आपले आई मुलाचे नाते मी स्वत: तोडत आहे.  जन्मभर स्वत:ला वांझ समजेन. मी आता माझ्यासाठी जगणार आहे. तो माझा हक्क आहे. तो कोणी हिरावून घेऊ शकत नाही. मला कुणाचीही गरज नाही. माझ्याबरोबर माझा कन्हैया आहे. देवघरातील कृष्णाची मुर्ती घेतली व घराबाहेर पडली. नगीनने रडत रडत पाय पकडून माफी मागीतली, बा जाऊ नको,…  बा थांब, पण मी निर्णय घेतला होता. मायेचे सर्व पाश तोडुन टाकले, नंतर तुमच्या आश्रमात आले. नगीनला पश्चाताप झाला. तो वारंवार मला परत येण्यासाठी निरोप पाठवत राहीला. त्याला स्वत: मला भेटण्याची हिम्मत होत नाही. दुरुन बघतो व परत जातो. त्याला मुलबाळ नाही. पपुबेन सगळी माणसे मुखवटा लाऊन जगतात. मला वीट आलाय त्या मुखवट्यांचा. परमेश्वर न्यायी आहे!!! पपुबेन माझे आयुष्य म्हणजे एक फाटलेले पुस्तक आहे. काळाच्या ओघात त्याची पाने जरी फाटली तरी बांधणी अजून ऊसवलेली नाही. कारण परमेश्वराच्या प्रेमाने ती घट्ट बांधलेली आहे. सध्या त्या पुस्तकाचा शेवटचा अध्याय चालू आहे व तो मला एकटीलाच पुर्ण करावयाची ईच्छा आहे." बोलता बोलता बकुबेनच्या छातीत कळ आली. पपुबेनने ताबडतोब आश्रमातील डॉक्टराना बोलावून घेतले. त्यानी  बकुळाबेनला ईस्पीतळात नेण्यासाठी रुग्णवाहीका बोलावली. बकुबेन त्याही स्थितीत मंदिराकडे बोट दाखवत होत्या. पपुबेनला राहावले नाही, त्यानी पटकन ईतरांच्या मदतीने त्याना मंदिरात नेले. त्याना वाटत होत की ईस्पीतळात जायचे म्हणून बकुबेनला दर्शन घ्यायचे आहे. बकुबेनने रामरायाच्या चरणावर डोके ठेवले. तिला तातडीच्या उपचारांची गरज होती. डॉक्टर म्हणाले "वेळ होतोय बकुबेन, उठा लवकर"  डॉक्टर त्याना उठवू लागले. बकुबेनचे अंग थंडगार पडले होते. डॉक्टरानी नाडी तपासली व मान खाली घातली. पुस्तकाची वीण परमेश्वराने ढीली केलेली होती. त्यातील अक्षरे बकुबेनने त्याच्या चरणावर अर्पण केली. आता उरली होती निव्वळ रद्दी. आयुष्यभर इतरांच्या हक्कासाठी झिजलेल्या बकूबेनने स्वत:चा हक्क बजावला होता.

6 comments:

  1. मन सुन्न झाले कथा वाचून . अगदी
    हृदय पिळवटून टाकणारी कथा लिहीली आहे.
    संजय ह्या कथेतील बकुलाबेन ह्या
    स्त्रीची परमेश्वरावरील अविचल भक्ती ही
    खरेच शिकण्यासारखी आहे.
    कोणत्याही परिस्थीतिला शरण न जाता परमेश्वराला फक्त आपला एकमेव आधार
    मानून तसेंच आचरण करणे हे साधेसुधे काम नव्हे. खरोखरी प्रारब्धावर वार
    करणारी ती एक वारकरी होती म्हटले तर चूक होणार नाही असे वाटते. परमात्म्याची
    भक्ती म्हणजे लाचारी किंवा दीनता नव्हे.
    खरी ताकद भगवंताच्या अस्तित्वाच्या स्मरणातच आहे व हे स्मरण मला नामस्मरणातून सहजतेने प्राप्त होते. हा धडा सहजपणे बकू बेन शिकवून जाते .
    खूप सुंदर अप्रतीम कथा लिहीली आहे.

    ReplyDelete