उर्मिला


 
      डोळे मिटून माधव आरामखुर्चीवर गॅलेरीत बसला होता. त्याच्या मनात विचारांचे काहूर माजलेले, एका मागोमाग एक अविरतपण उसळणारे. भुतकालातील आठवणींची पाखरे अवती भवती भिरभिरत चोचा मारुन काळजात छेद करत होती. हृदयात भावनांच्या कल्लोळाचा उठलेला आगडोंब शरीराचा दाह करत पसरत चालला होता. गतकालातील घटना सारख्या दृष्टीपटलावर आदळत होत्या. असह्य होऊन त्याने डोळे उघडले. बरीच रात्र झालेली. समोर रस्त्यावरील दिवे दिवसभरातील सुःखदुःखे एकमेकांशी शेअर करत गप्पांमध्ये रंगले होते. मध्येच एखादा दिवा मिणमिणत, दुःखद अंतःकरणाने आपल्या शेवटच्या अस्तीत्वाची जाणीव करुन देत तळमळत होता. रातकिड्यांच्या वाद्यवृंदाला आलेल्या बहराला मध्येच एखाद्या कुत्र्याचे भुंकणे व्यत्यय आणत होते. रातराणीचा आसमंतात दरवळणारा सुगंध घेउन मध्येच एखादी झुळुक त्याला दिलासा देण्याची व्यर्थ खटपट करीत पसार होत होती. चहूकडे  पसरलेले अंधाराचे साम्राज्य माधवच्या अस्वस्थतेला गडद करत होते. मान मागे वळवून माधवने सुस्कारा टाकला. वर आकाशात एक तारा वेगाने खाली पडता पडता नजरेआड झाला. उल्का होती ती, मनाशीच पुटपुटत माधव आठवणींच्या गर्दीतून बाहेर येण्याचा केविलवाणा प्रयत्न करता करता हळवा झाला. पापण्यानी आत्तापर्यंत रोखलेले थेंब बंड करुन दुतर्फा पसरले. स्फुंदत स्फुंदत माधव रडु लागला. पश्चातापाचे ते अश्रू त्याला चटक्याप्रमाणे वेदना देऊ लागले.

     सायंकाळी माधवच्या मित्राचा, अविनाशचा फोन आला होता. गदगदलेल्या कंठाने त्याने माधवला सांगीतले, "माधव उर्मिला आपल्याला सोडुन गेली रे, अनंताच्या प्रवासाला...." माधवच्या पुस्तकातील मोरपीस हरपले.

     माधव क्षोत्री, सुखी कुटुंबातील, दोन लहान बहीणींचा लाडका दादा, आई-वडील दोघेही एकाच कंपनीत नोकरीला. घरातील वातावरण दृष्ट लागण्यासारखे. पैशांची कमतरता नव्हती. माधवही चांगल्या कंपनीत उच्च पदावर कार्यरत. जिद्द व मेहनतीच्या बळावर  कंपनीच्या प्रगतीला हातभार लावणारा,  वरिष्ठांच्या मर्जीतील कर्मचारी. गंभीरपणे वावरणारा माधव स्टाफमध्ये खडूस साहेब म्हणुन प्रसिद्ध. स्टाफ त्याला सदैव वचकून असे. पुर्वी तसा नव्हता तो, पण घडलेल्या एका घटनेने माधव अचानक बदलला होता. माधवचे आई-वडील एकत्र परदेशात प्रवास करताना विमान अपघातात गेले. त्याच्या कुटुंबावर झालेल्या दुहेरी आघाताने माधव सुन्न झाला. घरात तो एकमेव कर्ता पुरुष उरला होता. माधवच्या वडीलाना भाऊ-बहीण नव्हते. कोणी जवळचे नातेवाईकही नाही. बहीणीनी हंबरडा फोडून त्या शेजारच्या वैदेही काकूंच्या कुशीत शिरल्या, माधवला ते शक्य झाले नाही. राघव काकांच्या खांद्यावर डोके ठेवून मुसमुसत त्याने काकांचे उपरणे ओले केले. तेव्हापासून तो सदैव गंभीर चेहेरा घेउनच वागत असे, देवावरचा विश्वास उडाल्याने त्याच्यातील रुक्षपणा वाढत चालला होता. आजकाल जिद्दी, हट्टी व चिडचिडा झालेला, मनात अहंकाररुपी दुर्गुणाचा नकळत प्रवेश झाला, वागणुकीत तुसडेपणा आला. कामात स्वतःला गुंतवुन घेतलेल्या माधवला कर्तव्य सोडुन कसली भावनाच उरली नव्हती.

     एके दिवशी माधवचे कंपनीतील सहकारी पटवर्धन साहेब रिटायर्ड झाले. कंपनीने नवीन नेमणूक केली. सगळा स्टाफ नविन साहेबाच्या प्रतीक्षेत डोळे लावून बसलेला. आणी तिची एंट्री झाली.

     कंपनीच्या संचालकानी तिची ओळख सर्व स्टाफला करुन दिली. "ह्या उर्मिला देवधर आजपासून पटवर्धन साहेबांच्या हुद्यावर रुजू होताहेत." एक तरुणी मंद स्मित करत, सर्वाना अभिवादन करत आत प्रवेशत होती. भव्य कपाळाची, कुरळ्या केसांची, मोहक डोळ्यांची, गोरीपान, केसात गजरा, मध्यम उंचीची उर्मिला! संचालकांसोबत माधवच्या केबीनमध्ये आली. माधवने मान वर करुन पाहीले. साधारण पंचविशीची, साडी परीधान केलेली, चेहेर्यावर मेकअपचा लवलेशही नसलेली, आत्मविश्वासाचे तेज झळकत असलेली उर्मिला! त्याच्या समोर उभी होती. माधव अचंबीत होऊन तिच्याकडे पहातच राहीला, कारण आजपर्यंत ऑफीसमधील तरुणीना जीन्स, टी शर्ट,  ट्राउसर, लेगीन्स मध्ये वावरताना त्याने पाहीलेले, पण संपुर्ण भारतीय वेषभुशेत, गजरा माळून आलेल्या उर्मिलेच्या निरागस चेहेर्याने माधवला पहील्याच भेटीत घायाळ केले. क्षणभर त्याचे त्यालाच कळत नव्हते पण अंतरंगात झालेल्या खळबळीने तो पुरता गोंधळला होता. स्वतःला सावरत माधव खुर्चीतून उठला, आज खुप दिवसानी माधवला हसताना सगळे पहात होते. उर्मिलाने केलेल्या नमस्काराने माधव पुर्ण भानावर आला. त्यानेही स्वतःची ओळख करुन दिली. ती आजपासुन त्याची सहकारी म्हणून कंपनीत रुजू झाली.

     उर्मिलाच्या येण्याने ऑफीसला नवचैतन्य आले. गंभीर चेहर्याचा माधवही आजकाल सगळ्यांशी हसून खेळून वागू लागला. बदललेल्या ऑफीसची, विशेषतः माधवची जाणीव सर्व ऑफीसला झालेली, पण उर्मिलाला कसलाही गंध नव्हता किंवा तिच्या मनातही कधी असले विचार आले नव्हते.

     उर्मिला मुळची पुण्याची, आई-वडीलांची एकुलती एक, कुणी भाऊ बहीण नाही. वडीलांची पुण्यात स्वतःच्या मालकीची देवधर इंजीनीअरींग कंपनी. उर्मिलाच्या आई-वडीलांचा स्वभाव उत्तर-दक्षीण ध्रुवाप्रमाणे विरुद्ध.वडील शिस्तबद्ध, हेकेखोर, पाश्चात्य संस्कृतीचा प्रभाव असलेले तर आई स्वातंत्र्य सैनीकाची कन्या. वडिल उर्मिलाचे लग्न करून तिला परदेशात स्थायिक करण्याची स्वप्ने पाहत असत. पण उर्मिलाच्या आईचे संस्कार, तिचे देशप्रेम दिवसेंदिवस उर्मिलाच्या मनावर बालपणापासून ठसत गेले.  उद्योगानिमित्ताने बाहेरच जास्त असल्यामुळे वडिलांचे प्रेम उर्मिलाला कमीच मिळाले. त्यांच्या विचीत्र स्वभावामुळे ती त्यांच्याशी नेहमी वचकुनच वागत असे. पण आईने तिच्यावर लहानपणापासूनच  आपल्या भारतीय संस्कृतीचा, वीर पुरुषांच्या त्यागाचा इतिहास बिंबविला. जिजाऊ, राणी लक्ष्मीबाई, सावित्रीबाई फुले, ह्यांच्या कथा ऐकत ऐकत उर्मिला मोठी झाली. त्यामुळे उर्मिलाला देशाबद्दल अतोनात प्रेम!  उच्चशिक्षित असूनही तिचे पाय जमिनिवरच कायम राहिले. निगर्वी, निरागस, सर्वाना मदत करणारी उर्मिला... शाळा, कॉलेजमधे शिक्षकांची लाडकी  सर्वाना हवीहवीशी वाटणारी उर्मिला!
    
     आयुष्यात काहीतरी करून दाखवण्याची उर्मी हृदयात बाळगून तिची वाटचाल चालू होती. तिला स्वतःच्या पायावर उभे राहण्याची जिद्द होती, पण वडिलांच्या स्वभावामुळे तिने स्वतःच्या इच्छा-आकांक्षाना मुरड घातली. तिचे खरे लाड केले असतील तर ते तिच्या शेजारच्या जोशी काकांनीच. जोशी काकांची दोन्ही मुले लग्न करुन परदेशात स्थायिक झालेली, त्यांची उणीव ते उर्मिलाकडून भरून काढत. एकेदिवशी धीर करुन तिने  नोकरी करण्याचे मनोगत वडिलांना सांगितले. वडिलांनी काहीही विचार न करता वयात आलेल्या उर्मिलाला व तिच्या आईला बेदम मारले, व धमकी दिली. उर्मिलाने मनाशी ठरवले नोकरी करायचीच.. तिने वर्तमान पत्रातून आलेल्या जाहिराती वाचून इंटरव्ह्यु दिले व एक दिवस ती धर्माधिकारी इंटरनेशनलमधे जॉइन झाली. वडिलांनी तिच्याशी व तिच्या आईशी बोलणे बंद केले.
    
      धर्माधिकारी इंटरनेशनल मधील गंभीर वातावरण आता उर्मीलाच्या कामाच्या पद्धतीने व वागण्याने बदलत चालले होते. काम करता करता, हसत खेळत वावरण्याने सर्वाना मोकळे मोकळे वाटू लागले. ऑफिसमधे उर्मिलाच्या नेतृत्वाखाली धार्मिक सणही आता उत्साहात साजरे होऊ लागले. रुक्ष स्वभावाच्या माधवाच्या मनातही हिरवळ पसरु लागली. तो पूर्णपणे उर्मिलेच्या एकतर्फी प्रेमात पडला व दिवसेंदिवस गुरफटत चालला होता. मोकळ्या मनाच्या उर्मिलाला मात्र कशाचाही मागमुस नव्हता..
   
     एक दिवस उर्मिला कामावर आली नाही. बघता बघता चार दिवस झाले; फक्त फोनवर निरोप दिला होता, की महत्वाच्या कामामुळे येता येणार नाही. हे कंपनीच्या नियमात बसत नव्हते. योग्य व मुद्देसुद कारणाशिवाय असे कुणी रजा घेऊ शकत नव्हते. माधव अस्वस्थ झालेला, ती त्याच्या बरोबरीच्या पदावर त्याची सहकारी म्हणून कार्यरत होती. पण त्याला ही नक्की कारण माहीत नव्हते. संचालकांनी तिच्या घरी चौकशीसाठी कर्मचाऱ्याला पाठविले.
    
     पडलेल्या चेहऱ्याने व भांबावलेल्या स्थितीत कर्मचारी परतला. उर्मिलाच्या वडिलांनी तिच्यासाठी स्थळ आणले होते. मुलगा परदेशात मल्टिनॅशनल कंपनीत उच्चपदस्थ होता. कंपनीचा बंगला, गाडी, नोकर चाकर सर्व दिमतिला.. इतर बऱ्याच सुविधा.. उर्मिलाने शांतपणे नाही म्हटले. वडिलांनी घर डोक्यावर घेतले. बराच वादंग झाला, पण उर्मिला शांतपणे तिच्या निश्चयावर ठाम होती. तिच्या आईला त्यांनी खुप अपमानित केले व मारहाणही केली. उर्मिलाने मनाचा हिय्या करून तिच्या बाबांना ठणकावून सांगितले, "बाबा तुमचे वैभव, तुमचा मानमरातब, तुम्हाला लखलाभ होवो, मी माझ्या आईला घेऊन घर सोडतेय."  त्या अहंकारी माणसाला पाझर फुटला नाही. ती सध्या तिच्या आईसमवेत मावशीच्या घरी राहतेय. आईवर ह्या घटनेचा खुप परिणाम झालाय. ती सतत रडत असते.
    
     हप्त्यानंतर कोमेजलेल्या चेहऱ्याने उर्मिला ऑफिसला आली. अचानक गैरहजर राहिल्याबद्दल संचालकांची माफी मागितली. घडलेल्या प्रसंगाचे गांभीर्य जाणून धर्माधिकारी साहेबांनी तिचे सांत्वन केले व म्हणाले, "अगं कमीतकमी आम्हाला घडलेला प्रकार तरी कळवायचास ना! आम्ही काही ना काही मदत केली असती.. भविष्यात कधीही, कसलीही गरज भासली तर आम्ही आहोत. घाबरु नकोस, परमेश्वरावर विश्वास ठेव आणि कामाला लाग."
 
     सर्व शल्य मनात लपवून उर्मिला पुन्हा कामास लागली. आईच्या बँकेच्या ठेवी मोडून व दागिने विकुन उर्मिलाने त्यांचे स्वतःचे एक लहानसे घर घेतले. उर्मिलाच्या आईच्या मनात आता सदैव उर्मिलाची चिंता घर करून राहिली, पुढे कसे होणार उर्मिलाचे!  ह्या भयाने ती अधुनमधुन आजारी पडू लागली. उर्मिला आता घर सांभाळून ऑफिसला येत होती व आईलाही धीर देत होती.
 
     एकदा ऑफिसमधे कार्यक्रमाच्या निमित्ताने उर्मिलाची आई हजर होती. तिथे माधवचे वागणे तिच्या अनुभवी मनाने हेरले, जाणले. तिलासुद्धा तो आवडला होता. घरी आल्यावर तिने तसे उर्मिलाला विचारलेही. उर्मिलाने शांतपणे सांगितले "माझ्या मनात तसे काहीही नाही. त्याला माझ्याबद्दल काय वाटते, ह्याने मला फरक पडत नाही. मला माझे काम महत्वाचे आहे. आई दिवसेंदिवस त्याच्याबद्दल विचारायची व उर्मिलाला सांगायची. "मला तो भावला, तुझ्यासाठी योग्य वाटतो, बघ जरा विचार करून." आईची भूण भूण, तिचे प्रेम व वास्तवाचे भान ठेवून, एकदा उर्मिला म्हणाली, "आई तुझ्याच संस्कारात वाढलीय मी, तुझ्याइतके मला कोणीच ओळखत नाही, पण फक्त तुझ्या इच्छेखातर, फक्त तुझ्यासाठी मी विचार करीन.. पण मला वेळ हवाय. मला त्याला जाणून घ्यावे लागेल, नंतर तुला नक्की सांगेन, आता धीर धर, विश्वास ठेव माझ्यावर." आईला हायसे वाटले.
 
     आता उर्मिलाचा माधवकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलला होता. ती त्याला जाणून घेण्याचा प्रयास करू लागली. बोलता बोलता घरच्या गप्पा सुरु होऊ लागल्या. माधवच्या आई वडिलांची दुःखद घटना व लहान बहिणींची स्थिती जाणल्यावर ती हळहळली तिला सर्व परिस्थितीची जाणीव झाली. माधव तर पहिल्या दिवसापासूनच तिची स्वप्ने पाहू लागला होता. तिच्या जवळीकीची एकही संधी तो सोडत नव्हता. पण उर्मिलाने कधीही मर्यादा ओलांडली नाही.
    
     एकदा माधवबरोबर कॉफी घेताना माधवनेच विषय काढला.. तेव्हा उर्मिला म्हणाली, "माधव, लग्न म्हणजे फक्त पती- पत्नीचा विषय नाही, तर ते दोन घरांचे भविष्य असते. दोन्ही घरांचे आपुलकीचे,  विश्वासाचे धागे एकत्र बांधून जे आनंदात राहतात, त्याला लग्न म्हणतात. ज्यांच्यामुळे सासर व माहेर दोन्ही सुखात नांदते, ते खरे लग्न. मला लहानपणापासून ते सुख मिळाले नाही, पण मी इतरांना त्या सुखापासून वंचित ठेवू शकत नाही. 

     भगवान श्रीरामांना मी लहानपणापासून आदर्श मानलेय. स्वतःच्या सुखांवर पाणी ओतून, कर्तव्यनिष्ठ जीवन जगलेल्या पुर्णपुरुष, पुरुषोत्तम श्रीरामप्रभूंना मी त्यांच्या आदर्शासहित जपलय. पण मला राहून राहून कौतुक व आदर वाटतोय तो भगवान लक्षमणांचा. बघ ना! संपूर्ण आयुष्यभर त्यानी जे काही केलय ते त्याच्या रामासाठीच! स्वतःच्या जीवनाचा कण नि कण त्यानी त्यांच्या बंधुसाठी अर्पण केला; ते स्वतः देहाने जरी वेगळे असले तरी त्यानी त्यांचे स्वतःचे अस्तित्व कधी ठेवलेच नाही. काया, वाचा, मने रामरायांसाठीच झिजले व जगले भगवान लक्ष्मण. 

     भगवान लक्ष्मणांच्या जीवनकार्याची भव्यता, दिव्यता व श्रेष्ठता मला नेहमी विचार करण्यास भाग पाडते. त्याच्या इतका त्याग कोणी केला असेल असे मला वाटत नाही. अरे दशरथपुत्र असूनही त्यांचे खरे माता पिता श्रीराम व जानकीच होते. हे खूपच कमी लोक उमजू शकले. पण लक्ष्मण हे माझ्या जीवनाचे ध्येय आहे..... त्यामुळे माझी काही मते आहेत, बघ पटली तर, जोपर्यंत तुझ्या दोन्ही बहिणींची लग्ने होऊन त्या संसार थाटत नाहीत, तोपर्यंत तू लग्नाचा विचार करू नकोस."
    
     माधवला विजेचा जबरदस्त झटका बसल्यासारखे झाले. तो उर्मिलेसाठी अधीर झालेला, पण तिचे विचार समजण्याइतकी दूरदृष्टि व मोठे मन अहंकारी माधवकडे नव्हते. तिचे विचार त्याला पटले नाहीत व उगाच त्याच्या मनात शंकेची पाल चुकचुकली. उर्मिला घरी एकटीच वाढलेली, तिला बहिण भाऊ नाहीत.. तिला स्वतंत्र आयुष्य जगण्याची सवय लागली आहे, म्हणून तिचा हा बहाणा असेल. काहीही उत्तर देण्याचे सौजन्य न बाळगता तो ताड़कन उठला व निघून गेला.... पाणावलेल्या डोळ्याने  उर्मिलाने हॉटेलचे बिल भरले व ती घरी निघाली.
     
     त्यानंतर माधव उर्मिलेशी नीट वागत नव्हता. तो तिच्यापासून दूर राहु लागला. उर्मिला शांत होती. तिच्या कामात व व्यवहारात काहीच बदल झाला नव्हता,  पण तिच्या अंतरंगात माजलेली खळबळ ऑफिसमधे सर्वांना जाणवत होती. माधवचा अहंकार कमी झालेला नव्हता. त्याने संचालकाना सांगून स्वतःची बदली त्याच्या राहत्या जागेपासून जवळच निर्माण झालेल्या नव्या ब्रांचमधे करून घेतली. याबाबत त्याने उर्मिलाशी एका शब्दानेही चर्चा केली नाही किंवा तिला कळवलेही नाही. उर्मिलाला धक्का बसला. माधवने नविन ब्रांचचा चार्ज घेण्याअगोदर ऑफिसमधे सहकार्याना निरोपाची पार्टी दिली. त्याला जाताना पाहुन इतरांचे नसतील पण उर्मिलाचे डोळे डबडबून आले. तिच्या भावनांचा, मतांचा, माधवने कधीच विचार केला नाही याचे शल्य त्या डोळ्यातून बाहेर आले.

     मध्ये बरीच वर्षे निघून गेली. माधवच्या दोन्ही बहिणींची लग्ने झाली. उर्मिला एखाद्या पाहुण्यासारखी उपस्थित होती. एव्हाना तिच्या व माधवाच्या प्रेमसंबंधाची माहिती तिच्या दोन्ही बहिणींना कळली होती, पण दोघांमधे दुरावा निर्माण होण्यासाठी असे काय घडले? ह्याची कल्पना त्या दोघींना तसेच ऑफिसमधेही कुणालाच आली नाही. दोघांनीही ते रहस्य कुणासमोर उघड केले नाही. उर्मिलाची आई वारंवार उर्मिलाला विचारायची. "काय गं, पुढे काय? तू काही बोलतच नाहीस." यावर उर्मिलाचे एकच उत्तर असे .. "माझा रामराया आहे ना! तो घेईल सर्व काळजी. सगळं काही ठीक होईल. तू निश्चिन्त रहा."

     इकडे बहिणींची लग्ने झाल्यापासून, माधव एकटा पडला होता. त्याला आता एकटेपणा जाणवू लागला. उर्मिलाच्या आठवणीनी तो व्याकुळ होऊ लागला. सदैव बेचैन असायचा. एके दिवशी त्याला कळले उर्मिलाने ती नोकरी सोडली. तिच्या आई बरोबर व इतर सहकार्यांबरोबर मिळून एक संस्था निर्माण केली, जी आत्महत्या केलेल्या शेतकऱ्यांच्या कुटुंबाला आधार देते, त्यांचे पुनर्वसन करते, त्यांना स्वतःच्या पायांवर उभी राहण्यासाठी आर्थिक व मानसिक मदत करते.
 
     आत्ता उर्मिलाने पन्नाशी ओलांडली व माधव पंचावन्न वर्षांचा झाला होता. कशीबशी माहिती मिळवून माधव तिच्या संस्थेत पोहोचला. बाहेर मोठ्या अक्षरात पाटी लिहीलेली होती. "साफल्य".  उर्मिलाचा चेहरामोहराच बदलला होता. पिकलेले केस व पांढऱ्या साडीत ती वयापेक्षा पोक्त वाटत होती. मधल्या काळात तिची आई निवर्तली, संस्थेचा भार ती एकटी सहकार्यांसोबत समर्थपणे वाहत होती. सरकारने तिच्या 'साफल्य' ह्या संस्थेसाठी व  कार्यासाठी मोफत जमीन उपलब्ध करून दिली. बऱ्याच दानशूर व समाजसेवी व्यक्तींनी संस्थेला सढळ हस्ते देणग्या दिल्या होत्या. जमिनीत आधुनिक पद्धतीने बारमाही पिक कसे काढावे, दुष्काळी परिस्थितीतही पिक कसे घ्यावे, पावसाच्या पाण्याचा वर्षभर विनिमय कसा होईल, त्यासंबंधी विविध रचना व कार्य कसे करावे, तसेच 24 तास वीजपुरवठा व्हावा ह्यासाठी सोबत सोलार सिस्टमचा वापर कसा करावा, सर्व गरजांची पूर्तता करणारी आदर्श व्यवस्था कशी असावी ह्याचे उत्कृष्ट उदाहरण म्हणजे "साफल्य" संस्था. 

     इथे शेतकऱ्यांच्या मुलाना शेतीचे तसेच इतर आवश्यक शिक्षण देण्यासाठी एका वेगळ्याच धर्तीवर विशेष शाळेची निर्मिती केलेली होती. सेवाभावी तरुण व आजुबाजूच्या परिसरातील विद्यार्थी इथे श्रमदानाची सेवा नियमित देत असत. सहजच माधव उर्मिला संस्थेत कुठे राहते ते पाहण्यासाठी संस्थेच्या कार्यकर्त्यांबरोबर गेला. एक छोट्याशा दहा बाय दहा च्या खोलीत तिचे वास्तव्य होते. त्यात एक पुस्तकांचे कपाट, कॉम्प्युटर व्यवस्था, एक कॉट व कपड्याची ट्रंक, एवढ्याच वस्तु. कोनाड्यात एक छोटेखानी देव्हारा.. त्यात सीतामाता व भ्राता लक्ष्मणासह श्रीरामप्रभू विराजमान, समोर तेवत असलेले निरांजन व अगरबत्तीचा सुगंध, एका पवित्र मंदिराचा आभास निर्माण करत होते. भिंतीवर मोठ्या अक्षरात लिहिले होते, "शेतकरी जगला, तरच देश जगेल. शेतकरी जगलाच पाहिजे व तो ही मानाने." माधवला संस्थेची माहिती देऊन कार्यकर्ता निघून गेला. उर्मिला आपल्या कामात मग्न होती. निघताना तिला भेटण्यासाठी माधव गेला.

     आयुष्यात आपण काय गमावलय ह्याची त्याक्षणी माधवला मनोमन जाणीव झाली. पश्चातापाने त्याच्या डोळ्यात पाणी आले. आपल्या अहंकाराने व गैरसमजाने आपण स्वतःचे जीवन कसे उध्वस्त केले त्याची जाणीव होऊन त्याने उर्मिलाला हात जोडून नमस्कार केला. उर्मिलाचा चेहरा निर्विकार होता. प्रेमात उध्वस्त झालेल्या एका संस्कारी स्त्रीने इतरांच्या जीवनात आनंद पसरवला होता. मनोमन तिची माफ़ी मागून त्यावेळी माधव घरी परतला आपण केलेल्या अक्षम्य चुकीचे शल्य मनात ठेवून,कायमच… 
आणि ते शल्य उर्मिला गेल्यानंतरही मनातून गेल नाही.

     उद्विग्न मनस्थितीत काल रात्रभर जागलेला माधव, पहाट होताच ड्रायव्हरला घेऊन साफल्याच्या दिशेने निघाला. मनात पहील्या भेटीपासून.....हॉटेलमध्ये कॉफी घेतानापर्यंतचे उर्मीलाचे विचार आठवून तो पश्चातापाच्या अग्नीत होरपळत होता. त्याच्या कृतीची त्याला स्वत:लाच घृणा वाटत होती. अपराधीपणाच्या भावनेने मेंदु बधीर झाला. विचाराने त्याला ग्लानी येउ लागली. "साफल्य" आले साहेब'..... ड्रायव्हरच्या आवाजाने माधव भानावर आला. तोंडावर पाणी मारुन, चेहरा पुसत माधव प्रवेशद्वारावर पोहोचला. 

     अंतिम संस्कार विधि उरकले गेले होते. धाय मोकलुन रडणारी तेथील शेतकऱ्यांची कुटुंबे व आश्रमातील सेवक वर्ग पाहुन कधी नव्हे तो माधवने पहिल्यांदाच हंबरडा फोडला. उर्मिलाsss.. तिच्या चितेची राख मस्तकी लावून माधव  तिच्या दहा बाय दहाच्या घराकडे निघाला.  देव्हार्यात निरांजन पेटवण्यासाठी म्हणून तो  देव्हार्याकडे  वळला. भगवान श्रीरामप्रभु व सितामाता कसल्यातरी विचारात मग्न दिसले. शेजारी भगवान लक्ष्मणाची मूर्ति नव्हती. माधव मुर्छीत अवस्थेत कोसळला. तेथील कर्मचार्यानी माधवला सावरले. भानावर आलेल्या माधवने  खिशातून पेन काढून  स्वत:चे मृत्युपत्र लिहीले संस्थेला मदत म्हणून त्याची सर्व संपत्ती दान केली. संस्थेचे व्यवस्थापक आले त्यानी माधवला एक पत्र दिले. माईने हे पत्र तुमच्यासाठी ठेवले आहे. सर्व जण आदराने उर्मिलाला माई म्हणत. बंद लिफाफ्यावर नाव लिहीले होते. माधव क्षोत्री. थरथरत्या हाताने माधवने तो लिफाफा उघडला.
    
प्रिय माधव,
माधव! स्त्रीचे जीवन हे एखाद्या तसबीरीच्या फ्रेम सारखे असते. लोक नेहमी तसबीरीच्या आतील दृश्याकडे पाहतात व सुखावतात, पण फ्रेम सहजासहजी कोणाच्या लक्षात राहत नाही. तिच्या चौकटीने ती सदैव आतील चित्राचे रक्षण करत असते. व ही चौकट ढासळू नये म्हणून बाहेरील प्रहार सोसत, मानापमानाची पर्वा न करता झीजते. तिच्या चौकटीत सामावलेल्या विश्वाला सुखी करण्यासाठी! चौकटीतील प्रत्येक बाजू एकमेकांशी सांधून ती हा डोलारा सांभाळत असते. त्याला परिवार म्हण, कुटुंब म्हण किंवा घर म्हण. माझ्या मते कुटुंब असेच असावे. चार चौकटीतील वरील बाजू ही भगवंतावरील विश्वासाची असते.. त्याच्या शेजारीच मागे असलेेला हुक म्हणजे आदिमाता, विश्वाच्या डोलार्याप्रमाणेच प्रत्येकचा आधार. जी सदैव असते. पण आपली नजर तिथे पोहोचत नाही. संपूर्ण फ्रेमला असलेला तो महत्वाचा आधार! उजव्या व डाव्या बाजूला असलेल्या दोन बाजू म्हणजे, सासर व माहेर.. खाली असलेली आडवी बाजू म्हणजे तिचा पति.. जो सासर व माहेर ही दोन्ही नाती जपत, आत असलेल्या कुटुंबाला सावरण्याचे कार्य करतो. ह्या बाजूचे महत्व तिच्यासाठी खूप, खूपच आहे. हुकमधुन निसटलेली फ्रेम पूर्ण उध्वस्त होते. पण खालच्या बाजूची पट्टी निसटली तर, इतर बाजूच्या पट्टया असूनही. आतले कुटुंब मात्र उध्वस्त होते. तुला फ्रेम कधी कळलीच नाही माधव.

उर्मिला...

4 comments:

असाही पाऊस


फोडुनिया ढगांची गर्दी, विद्युल्लता गरजल्या |
दाटूनी आले आभाळ अन धारा त्या बरसल्या ||

फेडुनिया सारी वस्रे बेभान तन नहाले |
बुद्धीला मारुनी मिठी, मनही तृप्त जहाले. ||

शांत झाली वसुंधरा, गंध लागे दरवळू |
सुखावली सारी सृष्टी, भुमी लागली विरघळू ||

देठासंगे घेऊनिया फला, पर्णही जागा सोडती |
करावया जलक्रीडा, ते सर्व खाली दौडती ||

आनंदात चिंब सारे, प्रसन्न झाले मन |
अवचित एक किंकाळी, फोडुन गेली कान ||

दृष्टी लागली शोधू, अन शब्द कानात दाटले |
पहाता ते दृष्य सारे, काळीज अवघे फाटले ||

सारुनी गर्दी दुर, पाउले तेथे सरकली |
वेदना अंतरी घेउनी, माघारी ती फिरकली ||

झाडाखाली आक्रंदत एक माता, बडवित होती उर |
कपाळास हात लाउनी बाप बसला होता दूर ||

पोटासाठी कामाच्या रगाड्यात, विसरुन गेले बाळ |
त्यांच्या आधीच तेथे पोहोचला होता काळ ||

भर पावसात चिमुरड्याचा, आक्रोश न कोणा कळला |
घेउनी मिठीत त्याला, काळ माघारी वळला ||

आजही पावसात जेव्हा, भिजावया बाहेर पडतो |
आठवण ती येता दाटून, हुंदके देत रडतो ||

आक्रोशणारी माय जेव्हा डोळ्यावर दिसते, 
तेव्हा बदलतो कुस |
झोपेतच बडबडतो कधी, 
कुणाच्याही जिवनात न यावा असाही पाऊस, 
असाही पाऊस ||

- संजय वायंगणकर

4 comments:

हक्क


          खळ्ळ्.............काच फुटल्याचा आवाज आश्रमाच्या शांततेला चिरत कानात शिरला. सर्वांच्या माना त्या दिशेला वळल्या. बकुळाबेन थरथरत त्या फुटलेल्या काचांकडे पहात घामाघूम झालेल्या स्थितीत उभ्या होत्या. "काय झाल बकुबेन?" प्रफुल्लताबेनने विचारलेल्या प्रश्नावर बकुबेनने मान वर केली. त्यांच्या डोळ्यात एक अनामिक भिती दाटली होती. त्या अजुनही थरथरतच होत्या. त्यांच्या खांद्यावर हात ठेवून प्रफुल्लताबेनने विचारले "बकुबेन बर नाहीय का? काही त्रास होतोय? डॉक्टराना बोलाऊ का?"  त्याना खुर्चीवर बसवून पाणी दिले. बकुळाबेन आता भानावर आल्या व म्हणाल्या "काही नाही पपुबेन, जुन्या आठवणीनी मनाचा ताबा घेतला, थोडसं गरगरल्यासारखे झाले बस्स्,  जाउ दे, वाढायच काम बाकी आहे. मी चालली" अन किचनकडे वळल्या. बकुळाबेनला थांबवत पपुबेन म्हणाल्या "आम्हाला नाही सांगणार बकुबेन?" सर्वजण प्रफुल्लताबेनला प्रेमाने पपुबेन अशी हाक मारत.

6 comments:

सोबतीला उंबरा.



परतुनी येशील तु, ही आस मनी आहे
उंबर्‍यातच बैसुनी,  मी वाट तुझी पाहे

बहुत दिन सरले,  अन रात्रीही गेल्या
शुष्क नयनांच्या, उरल्यात कडा ओल्या

अजुनी डोळ्यात दिसशी, तु जाताना पाठमोरा
आठवणींच्या असंख्य दाटल्या, अंतरी येराझारा

शब्द तुझे सुगंधी, स्मरता श्रुती प्रफुल्लित
स्मित तुझे आठवता, नेत्र आनंदे स्फुरत

तुझ्या सहवासाची रांगोळी, घातली मी दारी
भावनांच्या छटा त्यात, नित्य मी निहारी

...गणवेश तुझा आला घरी,परि तु न त्यात आला
नियतीने डाव साधिला, घालुनिया घाला

देशाने केला गौरव, अर्पुनी चक्र तुजला
करुनिया सांत्वन दिधले, सन्मानचिन्ह मजला

काय करु त्या पदकाचे? ,ज्यात नाही माझा राया
श्रेष्ठ जरि सन्मानचिन्ह, तरि तुजविण वाया.

आबोली नंतर बोललीच नाही,  मोगर्‍यासही नसे गंध
चैतन्यची हरपून गेले , सर्व वातावरण कुंद.

ओवाळीले ते निरांजन, अजुनी आहे प्रदिप्त
मंद प्रकाशात त्याच्या, आशा जागविते सुप्त

झोपाळा बघ अजुनी हलतो,  परि न आपण त्यात
दिवस झरकन निघून जातो, छळते अख्खी रात.

अर्ध्यावर तु सोडुनी गेलास, तुझ्या मागुनी येईन म्हणते
परि हतबल आहे, तुझे प्रेम उदरी गुणगुणते

अवघडते शरिर, मन हृदय धडधडते
तुझे बीज अंतरी माझ्या, कलेकलेने वाढते.

येना....रे....परत.....सख्या..... पाश सर्व तोडुनी.
एकत्रच जाऊ पुन्हा, आत्म्यास आत्मा जोडुनी.

अजुनही  आस आहे, परतुनी येशील तु माघारा
आत तो अन बाहेर मी, वाट पहातोय तुझी,
अन सोबतीला उंबरा, 
अन सोबतीला उंबरा,

- संजय वायंगणकर -

8 comments:

जेथे जातो तेथे तु माझा सांगाती



     गुढी पाडव्याच्या दिवशी कुटुंबाबरोबर बसून टीव्ही सिरीयल पहात होतो. प्रसंग असा होता, एका कंपनीत मालक अकाउंटंट ह्या पदासाठी पेपरात जाहीरात देणार आहे. जुन्या अकाउंटंटला ह्या गोष्टीची माहीतीच नाही. पण त्याच्याबद्दल आपुलकी असलेले मित्र पुरते भांबाउन गेलेत, बेचैन झालेत. त्याना त्यांच्या त्या जुन्या मित्राची नोकरी वाचवायची आहे. त्याना त्या मित्राची, त्याच्या कुटुंबाची काळजी वाटते आहे, व त्यासाठी ते बॉसबरोबर बोलण्याचे ठरवताहेत. पुढे काय होणार? हे पुढच्या भागात कळेल. पण......................


     आज कालच्या कॉर्पोरेट युगात हे सामान्य झालय. सर्रासपणे चाललय. सकाळपर्यंत हसतखेळत काम करणाऱ्या कामगाराला संध्याकाळी निघताना अचानक सांगीतले जाते. मि. कुलकर्णी तुम्ही अकाउंटस् डिपार्टमेंटमधून तुमचा हिशोब घेउन जा. कंपनीला तुमच्या सेवेची सध्या गरज उरली नाही. तुमच्या जागेवर दुसऱ्या व्यक्तीची नेमणूक केली आहे.


"काय भयानक प्रकार आहे हा. कसलेही तारतम्य नाही. कसली माणुसकी नाही. माणसे म्हणजे काम करणारी मशीन्स आहेत का रे.... ?, त्याना काही भावना आहेत की नाही? इतकी वर्षे त्याने त्या कंपनीत सेवा दिलीय. त्या साठी त्याने त्याचे कौशल्य वापरलय, वेळप्रसंगी घरादाराकडे दुर्लक्ष केलय. मुलाबाळाना वेळ न देता, ओव्हरटाइम करुन तो खपलाय तुमच्या कंपनीसाठी. तुमच्या...??? त्याने स्वःताची कंपनी म्हणुनच काम केलय तिथे. जेवढा घरात नाही तेवढा वेळ तुमच्या कंपनीत वावरलाय तो.  त्याच घरच होत ते." 
  
     "बाबा आज मला फिरायला घेउन जा म्हणणाऱ्या  मुलांसाठी त्याच्याकडे वेळ नव्हता. आजारी आईला दवाखान्यात नेण्यासाठी त्याच्याकडे वेळ नव्हता. बायकोला सासुरवाडीला नेण्यासाठी त्याच्याकडे वेळ नव्हता. तुमच्यासाठी राबराब राबलाय तो. तुमची कामे होत होती तोवर तो तुमच्या कंपनीची शान होता. त्याच्या कर्तुत्वाने तुमची छाती फुगत होती. त्याचे कौतुक करताना तुमचे तोंड थकत नव्हते. मग का? का? असे वागलात त्याच्याशी ?
का ?"
     अजय तावातावाने एकटाच बोलत होता. सर्वजण स्तब्ध होते. कुणाकडे उत्तर नव्हते त्याच्या प्रश्नांवर. सर्वांच्या माना खाली होत्या. हतबल होते त्याचे सर्व सहकारी. 

         साधारण ३० वर्षांपुर्वी घराची जबाबदारी खांद्यावर घेतलेला अजय,     शिक्षण अर्धवट सोडुन नोकरी करु लागला. शिक्षण पुर्ण करता आले नाही म्हणून बेचैन असणारा अजय आता समजूतदार झाला होता. त्याचा त्याच्या देवावर विश्वास होता. मिळेल ते काम करत, नवीन नवीन गोष्टी आत्मसात करत तो  सर्व कामांत तरबेज झाला. त्याच्या निरपेक्ष वागणुकीने त्याने सगळ्याना आपलेसे केले होते. मोठ्या मोठ्या कस्टमरची कामे अजयने शिताफीने केल्याने ते खुष असत. त्यानी दिलेली बक्षीसे तो प्रेमळपणे नाकारत होता. पैश्यापेक्षा प्रतीष्ठा महत्वाची. पण  अजयकडे एक दुर्गुण होता. खर तर त्याला दुर्गुण म्हणायचे का? हाच एक प्रश्न होता. तो सडेतोड स्वभावाचा होता. मनात काहीही  आडपडदा न ठेवता तो निर्भीडपणे आपली मते मांडायचा. चापलुसी, बोटचेपेपणा, हाजी हाजी असला प्रकार नव्हता त्याच्या स्वभावात.
         
  
     काळानुसार संचालक मंडळी बदलत गेली. नवी मंडळी हेकेखोर व ढगात उडणारी होती. त्यांच्या चुकीच्या निर्णयाना अजयने विरोध केला. त्यांच्या चुका निदर्शनास आणुन दिल्या. कंपनीचे होणारे  नुकसान अजयची बेचैनी वाढवत होते. पण ह्या कॉर्पोरेट जगतात एक चुकीची पद्धत रुढ झालीय. "बॉस इज अल्वेज राइट". पण अजय हे वेगळेच रसायन होते. तो बॉसचा आदर करायचा, तसेच त्यांच्या चुका ही त्याना दाखवून द्यायचा. पुढे  जे व्हायचे तेच झाले. त्यांच्या डोळ्यात तो सलु लागला. ते अजयला टाळू लागले. त्याच्या शब्दाना होणारा विरोध पाहुन अजय आता  शांत बसू लागला. संचालकानी त्याची चारी बाजूने कोंडी केली होती. पिंजऱ्यात फडफडणार्या पक्षाप्रमाणे त्याची गत झाली होती. 

     "वय वाढलेला अजय, आता ही नोकरी नाविलाजाने करणार, त्याला या वयात या पगाराची नोकरी कोण देणार? संचालक मंडळ उवाच". ते अजयला खूप त्रास देउ लागले. पण म्हणतात ना, परमेश्वराच्या काठीला आवाज नसतो. ती ज्याच्यावर बसते त्यालाच कळते. 

      एक दिवस अचानक अजयच्या समोर एक व्यक्ती येउन ठाकते. त्या व्यक्तीच्या पडत्या काळात त्याला अजयने निरपेक्षपणे केलेली मदत त्याच्या ध्यानात असते. अजय त्याच्याकडे मन मोकळे करतो.

परमेश्वराची अगाध लीला काय असते पहा.


हा सदगृहस्थ आता खूप मोठा झालेला असतो. तो अजयला त्याच्या कंपनीत ऑफर देतो. अटी पाहील्यावर परमेश्वराच्या अकारण कारुण्याची झलक दिसतेच.


अट १ मी तुझा इंटरव्ह्यु घेणार नाही


अट २ माझ्या कंपनीत तु तुला जे आवडेल ते काम करावयाचे.


अट ३ तुला येण्याजाण्याची सोयीची वेळ तु ठरवायची.


अट ४ नवीन काम शिकण्यासाठी कोणतीही कालमर्यादा नाही.


अट ५ सर्वात महत्वाची तुला आता जेवढा पगार आहे तेवढा मी देणार.

     आज अजयच्या विठ्ठलाने त्याला त्याच्या नकळत कडेवर उचलून घेतले होते. व त्या पांडुरंगाला मिठी मारुन अजय त्याला प्रेमाश्रुनी चिंब करत होता.

सदर घटना एका सत्य कथेवर आधारीत आहे 
पात्राचे नाव बदलले आहे.

2 comments:

आधारवड




     डिसेंबर महीन्याची कडक थंडी पडली होती. प्रत्येक जण आपापल्या परीने थंडी पळवण्याचे वेगवेगळे उपाय योजत होते. उबदार ब्लँकेटमध्ये गुंडाळुन घेऊन काही जण झोपेची आराधना करत होते, तर काही आपापल्या पद्धतीने थंडी पळवत  होते.रात्रपाळीचा कामगार वर्ग नाईलाजाने चरफडत घराबाहेर पडत होता, काही घरात अजून टीव्हीचा आवाज चालू होता. दुसरीकडे रस्त्याच्या कडेला पुटपाथवर ताडपत्री टाकून रहाणारी कुटुंबे हवालदील झालेली दिसत होती. त्यांच्याकडे अंग झाकण्यासाठी पुरेसे कपडे नव्हते. उबदार अंथरुण पांघरुण तर त्यांच्या नशीबी नव्हतेच. होते फक्त कुडकुडणे. समोरच्या बाजूला रिकाम्या गँरेजमध्ये वाया गेलेले टवाळखोर दारुची पार्टी झोडत त्यांच्याच धुंदीत मदमस्त होते. त्यांच्या अधूनमधून खिदळण्याने रात्र जागी होत होती. सोसायटीचे पहारेकरी शेकोटीच्या उबेत गप्पा मारत बसले होते. डोळे जड होउन पापण्या एकमेकांवर आदळत होत्या. 

     वाचन बंद करुन अंथरुणात शिरणार, इतक्यात बाहेर कुजबुज ऐकू येउ लागली.  हळूहळू कुजबुजाटाचे गोंगाटात रुपांतर झाले. नक्कीच काही तरी घडलय, मी खिडकीतून डोकावले तर बाहेर गर्दी जमली होती. उत्सुकतेपोटी खाली उतरलो, माझ्याबरोबर काही शेजारीही जिना उतरत होते. 

     सोसायटीच्या बाहेर, वटवृक्षाखाली कोणीतरी छोटे मुल ठेवुन गेले होते. कोवळे अर्भक, जेमतेम सात आठ दिवसाचे असेल. भेदरलेला तो जीव आकांत करत होता. त्याच्या आजूबाजूला जमलेली गर्दी तर्क कुतर्क करत उभी होती. "मुलगी आहे," एक महीला सांगत होती. खुपच भयावह घटना होती ती, खूपच चीड आली होती त्या काळीज नसलेल्या आईबापाची. पहाटे लवकर कामधंद्यासाठी निघणारी मंडळी झोपेचे खोबरे झाले म्हणून मुलीला ठेवून जाणारांच्या नावाने शंख फुकत होती. त्यातही त्या  टवाळखोर मंडळीतून एका दोघानी अश्लील शेरेबीजी करुन स्व:ताची लायकी दाखवून दिली. काही जण मनापासून यावर उपाय शोधत होते. कुणी पोलीसाना तर कुणी अनाथाश्रमात फोन करत होते. बघताबघता रात्रीचे दोन वाजले. चलाख लोकानी बोलता बोलता काढता पाय घेतला.  आता तिथे हाताच्या बोटावर मोजता येतील एवढीच मंडळी होती. एका वृद्ध आजीने त्या बाळाला मांडीवर घेत गप्प करण्याचा प्रयास चालू ठेवला होता, पण ते अधूनमधून विदारकपणे आक्रोश करत होते. सगळेच भांबावून गेले होते, त्या भयाण थंडीत कुडकुडत उभे होते. कुठुनही काही मार्ग सुचत नव्हता. त्या बालीकेला वाऱ्यावर सोडणाऱ्याना शिव्याशाप देत एक एक जण सटकत होता. आजीलाही  तिच्या मुलाने हाताला धरुन घरी नेले. घेउन जाताजाता तीला दमही  दिला, "उगाच नसत्या भानगडीत पडू नकोस चल घरी". होय, ते बेवारशी बालक म्हणजे कठोर काळजाच्या समाजासाठी भानगडच होती. आता फक्त रडायचेच बाकी राहीले होते. देवा कडे हात जोडून विनवण्या करत होतो "असा कसा रे तु ? तो असहाय जीव थंडीत कुडकुडुन मरेल रे, त्याच्या आईबापाला सदबुद्धी दे, त्यांच्या हृदयाला पाझर फोड, त्या जीवाला जीवदान दे"...

     अश्रुना कोंडमारा सहन झाला नाही, ते बांध फुटल्यागत वहात होते. त्या बालीकेच्या जागी मला माझे  मुल दिसु लागले, आंतरीक वेदनेने मला ग्लानी आल्यासारखे वाटू लागले. कोसळणारच होतो तेवढ्यात  अचानक त्या लोकाना मागे सारत एक वृद्ध तेथे आला. त्याने चारी दिशाना नजर फिरवीली व शांतपणे त्या बाळाला उचलून छातीशी धरले. आक्रोश करणारा तो जीव आता शांत झाला होता. अजून एक आश्चर्याचा धक्का !!! त्या बाळाच्या अस्पष्ट पण हसण्याचा आवाज ऐकला...... तो वृद्ध कणखरपणे गरजला, "कोण म्हणतो तु बेवारस आहेस? कोण म्हणतो तुला घाणेरडे पाप? कोण म्हणतो तुला ना आई ना बाप ? अरे मी आहेना", आणि तसाच सगळ्यांकडे पाठ फिरवून तरातरा चालत गेला व मध्येच दिसेनासा झाला. क्षणात हे नाट्य घडून गेले.  सर्वजण हे घडताना फक्त पुतळ्यासारखे स्तब्ध होते निशब्द. अचानक सगळ घडल होत. भानावर येताच जो तो विचार करु लागला. "कोण? कोण होता तो? कोण असेल?"

     धडधडणाऱ्या हृदयाने, पाणावलेल्या डोळ्यानी आणी अंतरीच्या जाणीवेने ओळखले. अनाथांचा नाथ होता तो. वटवृक्षाच्या पारावर निराधाराला आधार देणारा आधारवड होता तो. आधारवड????  होय आधारवड होता तो.

4 comments:

चंदनयात्रा


     उगवत्या सुर्याला अर्ध्य देताना अण्णाचा हात थरथरत होता. आता हे नित्याचेच झाले होते.  अर्ध्य देताना आण्णा हल्ली एक वाक्य नेहमी पूटपूटत असे. पुरे झाले, आता लवकर बोलव रे रामेश्वरा. कशास मागे ठेवलस रे बाबा.

     गावावरुन मुंबईला शिकण्यासाठी आला आणी चाकरमानी झाला. तरी आण्णाला इथे करमत नव्हते. दिवस कसाबसा निघून जायचा पण रात्र तळमळत काढायचा. खाणावळ्याच्या घरात, गँलरीत निजताना गावाकडील आठवणीने गलबलून यायचे. गावचे घर, आईबाप, भावंडे, शेत, गोठा, बैल सगळे आठवून आण्णा उशी ओली करायचा. दिवस पुढे ढकलत ढकलत कमी खर्चाच्या खाणावळी बदलत बदलत आण्णा एकदाचा परबाकडे स्थिरावला. परब बाकी देवमाणूस हो, अडल्या नडल्यासाठी धावायचा. खाऊनपिउन सुखी, कुटुंबवत्सल. गावकऱ्यां चे खूप कौतुक परबाला. आल्यागेल्याकडे गावातली चौकशी करायचा आणी आठवणींची गाठोडी सोडायचा.

     धटधाकट दांडगा बाप, त्याला साप डसला, खूप धावपळ केली पण वाचला नाही. त्या दिवसापासून आईने अंथरुण धरले, हाय खाउन चार पोराना वार्यावर सोडुन महीन्याभरात बापामागोमाग गेली. परब सगळ्यात थोरला आणी धाकली फक्त २ वर्षाची. पोरका झाला परब. बापाची बहीण, परबाची आत्या बाकी धीराची, परबाला सांगीतले "हिम्मत कर आणी मुंबईला जा ह्या तीघाना मी बघते". 

     होळीत शेवटचा नारळ टाकून परबाने रडत रडत चाकरमान्यांबरोबर मुंबई गाठली. त्याच्या आयुष्याचीच  होळी झाली होती. १२ वर्षाचा कोवळा जीव, मिसरुड पण फुटले नव्हते. तालुक्याच्या बाहेर पाऊल न टाकलेला परब मुंबइत भांबावला होता. नवतीचे दोन दिवस संपले, शिक्षण नव्हते. कसाबसा महिना गेला. फुकट कोण खायाला घालते? टक्के  टोमणे ऐकून धायकुतीला आलेला परब रात्रीचा पिशवीत दोन कपडे टाकून बाहेर पडला. रस्त्यात रडत रडत भटकणार्या परबाला एका पारशाने पाहीले. पारशाच्या अनुभवी नजरेला ते जाणवले. त्याने परबाला जवळ बोलावून विचारपूस केली. आईबापानंतर इतक्या प्रेमाने कुणी विचारले नव्हते. परबाचा बांध फुटला, पारशाचा सदरा भिजवुन परब शांत झाला. पोरच तो, पोरकटच होता. आशेने किलकिल्या नजरेने तो पारशाकडे पहात होता. त्या चिमुरड्या जीवाच्या नजरेने पारशी घायाळ झाला होता. त्याने परबाला विचारले "माझ्याबरोबर येशील का? लहानसहान काम कर, पोटापाण्याची व्यवस्था मी करीन". परबाला पारशाच्या रुपात देवच भेटला होता.

     पारशी भला माणूस, चंदनाचा व्यापारी होता. तसेच इतर छोटेमोठे धंदेही होते त्याचे. पण मुलबाळ नव्हते. परब ईमाने ईतबारे मेहनतीने पारशाला कामधंद्यात मदत करु लागला. विश्वासु असल्यामुळे सगळ्यांचा जीव बसला त्याच्यावर. पारशाची बायको गुलरुख त्याला मुलाप्रमाणेच वागवत होती. आता गावी मनीऑर्डर जाउ लागली व परबाच्या आतेने सुटकेचा निश्वास सोडला. परबाची घरची स्थीती कळल्यावर पारशाने परबाच्या भावंडाना मुंबईला आणले. त्यांचे शिक्षण केले. परबाला तो स्वताच्या मुलाप्रमाणे वागवत असे. परबानेही कधी पायरी ओलांडली नाही. तो पारशाच्या कामकाजात रात्रंदिवस राबत होता. पारशाने परबाचे लग्न लाउन दिले. व त्याला तिथेच आडोशाला संसार थाटून दिला. दिवस सरत होते. परबाने ४० शी गाठली होती. पारशी आता थकला होता. परबच पारशाचे सर्व व्यवहार सांभाळू लागला. पारशाला आता शेवटचे वेध लागले होते, पारशाला मूलबाळ नव्हते. त्याने नातेवाईकांच्या नाकावर टिच्चून परबाला स्वताचा कायदेशीर वारस केला. कायद्याने परब आता सुखदेव मर्झबान चंदनवाला झाला होता. 

     परबाने भरल्या डोळ्याने ती कागदपत्रे देव्हाऱ्यात रामेश्वराच्या चरणावर ठेवली.  नमस्कार केला आणी शपथ घेतली. "हे देवा महाराजा मी  कोणाचो कोण?  मी तुका कधी बघीतलय नाय, पण ह्या पारशात माका तुजाच रुप दिसता. आज ह्यो नसतो तर रस्त्यार भीक मागत फीरलय आसतय. ह्यो दिवस बघूक मिळालो ही तुझी कृपा. आज तुझ्या पायाक हात लावन शपथ घेतय आजपासून माझ्याकडे येणार्या अडल्या नडल्या मानसांका जमात तशी मदत करीन, पन माझ्यासारखे ते दिवस वैर्याच्यापन नशीबात देव नको रे रामेश्वरा........."
बापाच्या डोळ्यातील अश्रु बघून परबाची मोठी झालेली मुलेही हेलावली व देवाला नमस्कार करुन निघून गेली.

      आण्णा कानात जीव आणून परबाची  सर्व कथा ऐकत होता. त्याला खुप हायसे वाटले. परबाने त्याला आसरा दिला. आण्णाला पोष्टात नोकरी लागली. कवडी कवडी जमवून आण्णाने घरटे बांधले, लग्न झाले सुशीलेसारखी सुशील बायको मिळाली. मुले झाली, शिकली सवरली, त्यांची लग्नकार्ये झाली. मोठी झाल्यावर घरटी सोडुन भरारी घेता घेता परदेशात स्थिरावली, ती पुन्हा माघारी आलीच नाही. सुशीलेच्या सोबतीत आण्णा स्वप्नातच नातवंडाशी खेळायचा. सुशीला पोरांच्या आठवणीने खंगत चालली होती. एकदा जिन्यावरुन घसरली आणी कंबरेत मोडली.

     आण्णा सून्न झाला. सुशीलाचे सगळच आता बिछान्यावरच होत होते.
आण्णा या वयातही  तिचं सर्वकाही स्वताच करत होता, जिद्दीने.   "कुटुंबासाठी खपली सुशीला, तिला परक्या हातात का सोपवू?" कसाबसा महीना काढला सुशीलाने. तीचे करताना आण्णाचे होणारे हाल सुशीलेच्या  जिव्हारी लागत होते.  त्या दिवशी सुशीलेने आण्णाला जवळ बोलवुन कनवटीला लावलेली उदीची पुडी त्याच्या  हातात दिली व म्हणाली पोरानी साथ दिली नाही, पण हीने जपले हो शेवटपर्यंत. बोलताबोलता सुशीलेचा हात सुटला. आण्णाचा हंबरडा ऐकुन चाळ धावली. आण्णाच्या नशीबी सुशीलेस भडाग्नी देण्याची पाळी आली. आण्णा आंतरबाह्य हलला ह्या घटनेने. त्याचा हंबरडा ऐकून माघ महीन्यातसुद्धा वरुणराजाने हजेरी लावली. आण्णाला आता कसलीच इच्छा उरली नव्हती. उगवत्या सुर्याला अर्ध्य देणे व संधीकालात तुलसीजवळ दिवा लावणे. सुशीलेचे कार्य तो  नेटाने पुढे नेत होता. पण आज काहीतरी वेगळेच वातावरण होते.  सुर्य बाहेरच येत नव्हता. ढगांत दडी मारुन बसला होता. नेहमीप्रमाणे अर्ध्य देता देता आण्णा अर्ध्यावरच कोसळला. आण्णाची तार रामेश्वराला पोचली. त्या दिवशी चाळीत कुणाची चूल पेटली नाही. सगळे हळहळत होते. कुठुन तरी परबाला खबर लागली. डोळ्याचा खाचा झालेला परब मुलांबरोबर स्मशानात पोचला. परबाच्या मुलानी सर्व व्यवस्था चोख ठेवली होती.

     सर्वजण आण्णाला चंदनाच्या लाकडांवर ठेवून शेवटचे दर्शन घेत होते. सगळ्यानी साश्रु नयनानी आण्णाचा निरोप घेतला. परबाला आधार देत त्याच्या मुलानी चितेजवळ नेले. थरथरत्या हाताने परबाने अग्नी दिला व आकाशात पाहून कुजबुजला. तुमची परंपरा जपली हो ह्या सुखदेव मर्झबान चंदनवालाने. आयुष्याचे चंदन केले हो तुम्ही. स्वतः झिजलात त्याचा सुगंध अजुन दरवळतोय अवतीभवती.

     तिथे सर्वत्र चंदनच होते. परबाच्या तीन लहान भावंडाना सांभाळत त्याची आत्या चंदनासारखी झिजली. परबाने आयुष्यभर अडल्या नडल्यांसाठी हाडे  चंदनासारखी झिजवली. पारशी दांपत्याने पोरक्या परबाला बापाची माया देउन आयुष्याचे चंदन केले. आण्णा कुटुंबासाठी चंदनासारखा जळला. सुशीला पोरांच्या विरहाचे दुःख विसरुन चंदनकाष्ठाप्रमाणे आण्णाबरोबर शेवटच्या श्वासापर्यंत उभी राहीली. जाताजाता मोडली पण जाताना आण्णाच्या हातात साईनाथांची उदी देउन स्वताच्या जीवनयात्रेचेच चंदन केले. आण्णा, सुशीला, परब ही सर्व साधी व देवभोळी माणसे दैवाला दोष न देता दुसऱ्यांसाठी झटणारी. स्वतः झिजून इतरांच्या जीवनात सुगंधाचा दरवळ पसरवणारी चंदनाची काष्ठे. आणि त्यांची ही चंदनयात्रा.

3 comments: