असाही पाऊस


फोडुनिया ढगांची गर्दी, विद्युल्लता गरजल्या |
दाटूनी आले आभाळ अन धारा त्या बरसल्या ||

फेडुनिया सारी वस्रे बेभान तन नहाले |
बुद्धीला मारुनी मिठी, मनही तृप्त जहाले. ||

शांत झाली वसुंधरा, गंध लागे दरवळू |
सुखावली सारी सृष्टी, भुमी लागली विरघळू ||

देठासंगे घेऊनिया फला, पर्णही जागा सोडती |
करावया जलक्रीडा, ते सर्व खाली दौडती ||

आनंदात चिंब सारे, प्रसन्न झाले मन |
अवचित एक किंकाळी, फोडुन गेली कान ||

दृष्टी लागली शोधू, अन शब्द कानात दाटले |
पहाता ते दृष्य सारे, काळीज अवघे फाटले ||

सारुनी गर्दी दुर, पाउले तेथे सरकली |
वेदना अंतरी घेउनी, माघारी ती फिरकली ||

झाडाखाली आक्रंदत एक माता, बडवित होती उर |
कपाळास हात लाउनी बाप बसला होता दूर ||

पोटासाठी कामाच्या रगाड्यात, विसरुन गेले बाळ |
त्यांच्या आधीच तेथे पोहोचला होता काळ ||

भर पावसात चिमुरड्याचा, आक्रोश न कोणा कळला |
घेउनी मिठीत त्याला, काळ माघारी वळला ||

आजही पावसात जेव्हा, भिजावया बाहेर पडतो |
आठवण ती येता दाटून, हुंदके देत रडतो ||

आक्रोशणारी माय जेव्हा डोळ्यावर दिसते, 
तेव्हा बदलतो कुस |
झोपेतच बडबडतो कधी, 
कुणाच्याही जिवनात न यावा असाही पाऊस, 
असाही पाऊस ||

- संजय वायंगणकर

4 comments:

  1. जीवन देणारे पाणी देणारा हा पाऊस जेव्हा मर्यादा सोडतो तेव्हा त्याचेच हे जीवन देणारे रूप जीवन घेणारे ठरते ह्याचे एकाच कवितेतून सुंदर दर्शन घडविले आहे .
    संजय सुंदर कविता आहे.

    ReplyDelete